भरारी पथकाची मोठी कारवाई; हॉटेलसमोरील संशयास्पद कारची तपासणी; हाती लागले मोठे ‘घबाड!

नाशिक : पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी हॉटेल छत्रपतीसमोर अंबोली फाटा शिवारातून जात असलेल्या चारचाकींची तपासणी केली. त्यावेळी पोलीसांनी हाती मोठे घबाड लागले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाची आणखी एक मोठी कारवाई आहे. 

संशयास्पद चारचाकीची तपासणी करताच सापडले घबाड

निरीक्षक मधुकर राख यांना त्र्यंबकेश्‍वर मार्गावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मद्यसाठ्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. नाशिक विभागाचे भरारी पथक- १ चे दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे, कर्मचारी विलास कुवर, धनराज पवार, श्याम पानसरे, सुनील पाटील, अनिता भांड यांनी कारवाई करत शुक्रवारी सकाळी हॉटेल छत्रपतीसमोर अंबोली फाटा शिवारातून जात असलेल्या चारचाकींची (एमएच १५ सीआर ५७२२), 
(जीजे ०५ सीडी ४९५६) तपासणी केली. त्यामध्ये राज्यात बंदी असलेला विदेशी मद्यसाठा आढळला. दादरा नगर हवेली याठिकाणी विक्रीसाठी जात असल्याची माहिती तपासात समोर आली. विक्रम साळुंखे (वय २८, रा. भरतनगर औरंगाबाद), अशोक दशपुते (रा. आडगाव, औरंगाबाद), भावेशभाई परमार (२९, रा. भावनगर, गुजरात), चंद्रदीप परमार (रा. बलिया, गुजरात) अशा चार संशयितांना ताब्यात घेतले.  

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

भरारी पथकाची मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी (ता. १८) सकाळी मोठी कारवाई केली. त्र्यंबकेश्वरच्या अंबोली फाटा येथे कारवाई करत १३ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप, संचालक उषा वर्मा, नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..