”भाऊ जेवण करून जा, गाडी मागू नकोस!” पेट्रोल, डिझेलचे दर कारणीभूत; नात्यांवर परिणाम

चांदोरी (जि.नाशिक) : सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलचे दर तर शंभरीच्या जवळ आले आहेत. याचे परिणाम आता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिसायला लागले असून, ग्रामीण भागात तर पाच-दहा मिनिटांसाठी गाडी मागितली तरी मित्र मित्रालाही ‘भाऊ, मोटारसायकल सोडून दुसरं काहीही बोल, वाटलं तर जेवण करून जा,’ असे म्हणून कटवत आहेत. यामुळे गावातील एकमेकांमध्ये कटूपणा आणण्यात पेट्रोल, डिझेलचे दर कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. 

एकमेकांमध्ये कटूपणा आणण्यात पेट्रोल, डिझेलचे दर कारणीभूत
सध्या पेट्रोलने शंभरी गाठली आहे. चांदोरीमध्ये पेट्रोलचे भाव ९७ रुपये ६७ पैसे इतके आहेत. त्यामुळे नागरिक आपल्या मोटारसायकलमध्ये कमीत कमी पेट्रोल टाकून गाडी चालवीत आहेत. सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्यामुळे कमी मायलेजवाल्या गाड्या वापरणे परवडत नसल्याने त्या उभ्याच दिसत आहेत, तर बरेच जण काटकसर करून गाडीमध्ये पेट्रोल टाकून वापरत आहेत. अनावश्यक ठिकाणी वाहनधारक प्रवास करण्याचे टाळत आहेत. पूर्वी पेट्रोलचे दर कमी असल्यामुळे कोणीही कोणाला मोटारसायकल देत असत. मात्र, सध्या देणे टाळले जात आहे.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

पेट्रोल दरवाढीमुळे गाडी देण्यास नकार

राग आला तरी चालेल, मात्र गाडी मागू नका, असे स्पष्टपणे बोलताना लोक आढळत आहेत. ग्रामीण भागात माझी गाडी घेऊन जा, असे मित्रांना म्हणणारे आता पेट्रोल दरवाढीमुळे गाडी देण्यास नकार देत आहेत. काही ठिकाणी संबंध दुरावू नयेत, यासाठीही काही जण शक्कल लढवीत असून, पेट्रोल टाकत असेल तर मोटारसायकल घेऊन जा, असा प्रेमळ सल्ला देत आहेत, तर काही जण गाडीत पेट्रोलचा थेंबही नसल्याचे कारण सांगत आहेत.  

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा