भाजपच्या सदस्य नियुक्तीला बडगुजर यांचा आक्षेप; ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविण्याची मागणी 

नाशिक : स्थायी समितीवरील भाजपच्या आठ सदस्यांची नावे जाहीर करताना विद्यमान चार सदस्यांचे राजीनामे नसतानाही त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची नियुक्ती केल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी बेकायदेशीर नावे जाहीर केली आहेत. आयुक्तांनी या बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी न करता शासनाकडे विखंडनासाठी पाठवावा, अशी मागणी नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती सुधाकर बडगुजर यांनी केली.

दरम्यान, नगरसचिव विभागानेही बडगुजर यांच्या पत्राला उत्तर देताना समिती सदस्यांचे राजीनामे प्राप्त न झाल्याची कबुली दिल्याने पुन्हा एकदा कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पुन्हा नवा वाद

उच्च न्यायालयाने तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये भाजपचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेनेच्या अतिरिक्त एका सदस्याची नियुक्त जाहीर केल्यानंतर उर्वरित दोन व भाजपच्या चार सदस्यांची नियुक्ती घोषित करणे अपेक्षित होते. परंतु महापौरांनी भाजपच्या नवीन आठ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. दोन वर्ष पूर्ण न झालेल्या भाजपच्या डॉ. वर्षा भालेराव, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी, राकेश दोंदे यांचे राजीनामे नसताना त्यांच्या जागेवर नवीन चार सदस्यांची नियुक्ती केल्याने शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी आक्षेप घेत बेकायदेशीर नियुक्तीचा ठराव असल्याचा आरोप केला. आयुक्तांनी ठरावाची अंमलबजावणी न करता शासनाकडे विखंडनासाठी पाठविण्याची मागणी त्यांनी केली. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

आता तरी भाजपने पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन कायदेशीर कामकाज करावे अन्यथा पुन्हा शासनदरबारी दाद मागावी लागेल. 
-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता  
 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले