भाजपमध्ये ‘झारीतील शुक्राचार्य’ शोधमोहीम; नगरसेवकांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर ‘वॉच’ 

नाशिक : वसंत गिते व सुनील बागूल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ११ नगरसेवक शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहेत. परंतु ज्यांची नावे चर्चेत आहेत, त्यांच्याकडून अद्याप दुजोरा मिळत नाही व विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी झालेली असल्याने पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे शिवसेनेत जाऊन नगरसेवक पद रद्द होण्याचीच शक्यता असल्याने तूर्त कोणी पक्ष बदल करणार नाही. परंतु भाजपमधूनच नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात असल्याने ‘झारीतील शुक्राचार्य’ शोधण्याची मोहीम पक्षाकडून हाती घेण्यात आली आहे. अशांना सन्मानाने घरी बसविण्याची किंवा शिवसेनेत वाजतगाजत पाठविण्याची तयारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

गिते व बागूल यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर ११ नगरसेवक शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या वावड्या उठत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरसेवकांची नावे जाहीर केली जात आहे. यामागे स्थायी समिती सदस्य, प्रभाग समिती सभापती तसेच अन्य विषय समित्यांच्या निवडणुका होणार असून, त्यावर वर्णी लावताना स्पर्धकांना बाद करण्याची खेळी खेळली जात आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ११ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. परंतू, काही पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता असा कुठलाच प्रकार नसल्याचा निष्कर्ष निघाल्यानंतर अफवा पसरविणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण, ते शोधण्याची मोहीम आखण्यात आली आहे. ज्यांना भाजप सोडून इतर पक्षांतर करायचे असेल त्यांना सन्मानाने पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

फडणवीस १३ जानेवारीला शहरात 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येत्या बुधवारी (ता. १३) नाशिकला येत आहेत. शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण संस्थेच्या कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. फडणवीस यांच्यापर्यंत शहरातील राजकीय घडामोडींचा अहवाल सादर करण्यात आला आहे. शहरातील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, यात अफवा पसरविणाऱ्यांना कानपिचक्या देणार असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

नगरसेवकपद रद्द होण्याची भीती 

विभागीय आयुक्त कार्यालयाकडे भाजप नगरसेवकांची गटनोंदणी करण्यात आली आहे. निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने पक्षांतर कोणी करणार नाही, झाल्यास त्यांच्यावर कारवाई होऊन नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता असल्याने तूर्त कोणाकडून पक्षांतर होणार नाही. भाजप देशातील सर्वांत मोठा पक्ष असल्याने अन्य पक्षांमध्ये जाऊन पायावर धोंडा पाडून घेणार नसल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.