भाजपमध्ये सही प्रकरण गाजलं! बदनामीच्या धास्तीने पदाधिकायांची तातडीची बैठक 

नाशिक : महापालिकेच्या शहर सुधार समिती व आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत स्वाक्षरी चुकल्याने पक्षाची झालेली बदनामी लक्षात घेता संघटनात्मक पातळीवर प्रमुख पदाधिकायांची कानउघाडणी करण्यात आल्याचे समजते. माजी संघटनमंत्री किशोर काळकर व विभागीय संघटक रवी अनासपुरे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत यापुढे अशा प्रकारच्या किरकोळ चुका सहन केल्या जाणार नसल्याचे खडेबोल सुनावले. 

नेमकं काय घडलं?

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, वैद्यकीय व आरोग्य तसेच शहर सुधार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी गेल्या आठवड्यात निवडणुका पार पडल्या. महिला व विधी समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या परंतू शहर सुधार व वैद्यकिय समिती सभापती पदाच्या निवडणुका मात्र स्वाक्षरीच्या चुकांमुळे स्थगित कराव्या लागल्या. जनमानसात भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष असल्याची प्रतिमा आहे. या प्रतिमेला स्वाक्षरी पुरानामुळे गालबोट लागल्याने त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. नाशिक सारख्या मोठ्या शहरात अशा चुका होत असतील तर पक्षाला परवडणारे नसल्याने माजी संघटनमंत्री काळकर व संघटन मंत्री अनासपुरे यांनी रविवारी नाशिक मध्ये तातडीची पदाधिकायांची बैठक घेवून निवडणकांचे धडे दिले. नगरसेवकांसोबत समन्वय साधणे, कागदपत्रे तपासणे, पक्षाची कार्ये लोकांपर्यंत पोहोचविणे, अंतर्गत वाद वरिष्ठांच्या कानावर घालून सामंज्यसाने तोडगा काढणे आदी प्रकारच्या सुचना देण्यात आल्याचे भाजप मध्ये बोलले जात आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा