भाजपला एक महिन्यानंतर कंठ फुटला कसा? खासगीकरणावरून शिवसेनेचा पलटवार

नाशिक : घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने टाकलेल्या जाचक अटी तसेच, आयुक्तांवर खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत शिवसेनेचे मोठे नेते या मागे असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केल्यानंतर त्यावर पलटवार करताना शिवसेनेने भाजपला महिन्याभरानंतर कसा कंठ फुटला, असा सवाल करताना भाजपच्या शिबिरांमधून नगरसेवकांना चुकीचे मार्गदर्शन होत असल्याचा शाब्दिक हल्ला चढविला. 

प्रशासनावर दबाव टाकून प्रस्ताव आणल्याचा आरोप

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला होता. त्यावर सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी यामागे शिवसेना नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला शनिवारी (ता.९) पत्रकार परिषदेत उत्तर दिले. भाजपमध्ये अभ्यासू नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. परंतु खासगीकरणाच्या प्रस्तावाबद्दल बोलताना त्यांचे अज्ञान दिसून आले. याचाच अर्थ नगरसेवकांना भाजपच्या बौद्धिक वर्गात चुकीचे मार्गदर्शन होत असल्याचे स्पष्ट होते. शासनाने प्रशासनावर दबाव टाकून प्रस्ताव आणल्याचा आरोप केला. ७ डिसेंबर २०२० ला महासभेत जादा विषयात प्रस्ताव दाखल मान्य करून घेण्यात आल्याचे भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले. याचाच अर्थ विषय पटलावर आला हे सत्य आहे. आमदारांनी आवाज उठविल्यानंतर ठराव रद्द करण्यात आला. त्यानंतर महिनाभरानंतर भाजप नेत्यांना कंठ फुटल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. 

...तर बिंग फुटण्याची भीती 

पटलावर आलेला प्रस्ताव मागे घ्यायचा असेल, तर महासभेत तो चर्चेला आणावा लागते. परंतु सविस्तर चर्चेतून भाजपचे बिंग फुटले असते. यामुळे ठराव परस्पर रद्द करण्यात आला. महासभेत आयुक्तांवर दबाव होता, असे भाजपचे म्हणणे आहे. महासभेत त्यावर सविस्तर विवेचन करता आले असते. खासगीकरणाचा प्रस्ताव आणण्यामागे कोण आहे, हेदेखील सभागृहात समोर आणता आले असते. परंतु अडचणीत येण्याची शक्यता लक्षात आल्याने भाजपने परस्पर प्रस्ताव मागे घेतल्याचे बडगुजर यांनी सांगितले. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

खासगीकरणाच्या मुद्यावरून तोंडावर पडल्याने भाजपकडून चोराच्या उलट्या बोंबा मारल्या जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फ्लॅट तयार झाले. त्यावर घरपट्टी लागू केली जात नाही. यावरून मोठे बिल्डर यामागे असण्याची शक्यता आहे. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते 

प्रदूषण टाळण्यासाठी बीएस-६ प्रकारच्या बस शहरात चालल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. मोकळ्या भूखंडावर १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय असतानाही तत्कालीन आयुक्तांनी बंदी आणली. सत्ता असूनही कोणी एकत नसेल तर दुर्दैव आहे. - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार