भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले

नाना पटोले www.pudhari.news

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर नाशिक मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले असल्याचे पटोले यांनी जाहीर केले.

नाशिकमध्ये भाजपला उमेदवारही मिळाला नाही. भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष असून, पाठीमागून वार करणार्‍या भाजपला जनताच धडा शिकवेल, असा दावा पटोले यांनी यावेळी केला.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर नाना पटोले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कोणत्या उमेदवारांना पाठिंबा आहे, हे जाहीर केले. पटोले म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित चर्चा करून नाशिक व नागपूर मतदारसंघाबाबत निर्णय घेतलेला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करत अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मविआचा पाठिंबा आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील व कोकणमधून बाळाराम पाटील हे असतील. विधान परिषदेच्या या पाचही जागांवर महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्ते एकदिलाने काम करून या पाचही जागा विजयी करतील.

पंतप्रधानांची प्रतिष्ठा पायधुळी तुडवली जात आहे… 

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा पाठिंबाच आहे, म्हणून तर काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड व हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. परंतु भाजपशासित राज्यात ही योजना लागू केली जात नाही. सरकारी कर्मचार्‍यांमध्ये या मुद्यांवरून भाजपविरोधात तीव्र संताप आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्देही महत्त्वाचे आहेत.

पंतप्रधानांना गटाराच्या उद्घाटनाला भाजप बोलवत आहे. पंतप्रधानांची प्रतिष्ठा आहे, ती पायधुळी तुडवली जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली. 

हेही वाचा :

The post भाजप हा दुसर्‍यांची घरे फोडणारा पक्ष, त्यांना नाशिकमध्ये उमेदवारही मिळाला नाही : नाना पटोले appeared first on पुढारी.