भाजीपाला निर्यातीतून देशाला ४,१२० कोटी! निर्यातीत १४ व्या स्थानी 

लासलगाव (जि.नाशिक) : देशातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यांत शेतमालाच्या निर्यातीत आशादायी स्थिती पाहायला मिळाली. यामुळे बळीराजाचे आर्थिक चलन थोड्या फार प्रमाणात सुरू झाले. या वेळी देशातून तब्बल १८ लाख ८२ हजार टन भाजीपाला निर्यात झाला असून, यातून देशाला चार हजार १२० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

कृषी उत्पादनामध्ये अव्वल उत्पादक

मागील वर्षी याच कालावधीमध्ये तीन हजार ६६० कोटी रुपयांचे चलन मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला निर्यातीत १२.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत देशातून शेतमाल निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, कृषी उत्पादनामध्ये अव्वल उत्पादक असूनही अव्वल निर्यातदारांमध्ये समावेश नाही. भाजीपाला उत्पादनात भारत तिसऱ्या स्थानी आहे अन्‌ निर्यात क्रमवारीत १४ व्या स्थानी आहे. याकरिता कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना काळात कृषी क्षेत्रातून समाधानकारक निर्यात होऊन देशाला चांगला व्यवसाय करता आला. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

भाजीपाल्याची समाधानकारक निर्यात
भाजीपाला निर्यात करणे अत्यंत जिकिरीचे असून, ‘कनेक्टिव्हिटी’चा मोठा अडथळा आहे. निश्‍चित वेळेत भाजीपाला शेतातून काढून वाहनात योग्य पद्धतीने भरावा लागतो. वातानुकूलित वाहन नसल्यास भाजीपाला खराब होण्याची भीती असते. भाजीपाला शीतगृहात नेऊन ग्रेडिंग व पॅकिंग करतात. त्यानंतर विमानतळावर माल पाठवून करार झालेल्या देशात निर्यात होतो. अशा अनेक संकटांवर मात करत देशातून भाजीपाल्याची समाधानकारक निर्यात झाली आहे. 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

शेतमाल देशाला चांगले परकीय चलन मिळू देणारे असल्याने केंद्राने निर्यातीकरिता दीर्घकालीन धोरण आखणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतमाल मोठ्या प्रमाणात निर्यात होऊन शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. 
-निवृत्ती न्याहारकर, भाजीपाला उत्पादक 

 

दिवसागणिक शेतमालाची निर्यात वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, अजूनही निर्यातवाढीस बराचसा वाव आहे. यासाठी कोणत्या देशात कोणत्या मालाला मागणी आहे, याबाबतची नेमकी माहिती शेतकऱ्यांना पुरविली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सरकारने निर्यातीचे धोरण अगोदर व्यवस्थित करणे आवश्यक आहे. -सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव 

भाजीपाला खरेदीदार देश 
युनायटेड अरब, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, कतार, यूके, ओमान, कुवेत, सौदी अरब, मलेशिया, मालदीव.