भातपिकासह ट्रॅक्टरही जळून खाक; मध्यरात्री खळ्यावरील आगीचे कारण गुलदस्त्यात

अस्वली स्टेशन (नाशिक) : सोंगलेला भात दिवसभर ट्रॅक्टरने वाहतूक करून घरी खळ्यावर आणला होता. सायंकाळी त्या ठिकाणी भाताच्या पेंढ्यांची भवर रचून ठेवली. रात्री दहापर्यंत भात सडकण्याचे कामदेखील सुरू होते. त्यानंतर जेवण करून सर्व जण घरात झोपायला गेले. अन् मध्यरात्रीच्या घटनेने केली स्वप्नांची राखरांगोळीच...वाचा काय घडले?

अशी आहे घटना

नांदगाव बुद्रुक (ता. इगतपुरी) येथील विलास गेणू पागेरे यांचे भात सोंगणी काम अंतिम टप्प्यात आहे. सोंगलेला भात गुरुवारी (ता. 26) दिवसभर ट्रॅक्टरने वाहतूक करून घरी खळ्यावर आणला होता. सायंकाळी त्या ठिकाणी भाताच्या पेंढ्यांची भवर रचून ठेवली. रात्री दहापर्यंत भात सडकण्याचे कामदेखील सुरू होते. त्यानंतर जेवण करून सर्व जण घरात झोपायला गेले. मध्यरात्री कधी तरी शेतात रचलेली भवर पेटली. त्यासोबत ट्रॅक्टरदेखील जळून खाक झाला. दिवसभर शेतातील कामाने थकलेले पागेरे कुटुंबीय गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास विलास पागेरे यांच्या मातोश्री उठून बाहेर आल्यावर आगीत भाताची भवर आणि ट्रॅक्टर जळाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी, आरडाओरडा करून घरचे लोक उठवीत आग विझविली गेली. मात्र तोपर्यंत संपूर्ण भात, ट्रॅक्टरचे चारही टायर जळून खाक झाले.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

पोलिसपाटील गंगाराम जाधव यांनी वाडीवऱ्हे पोलिसांत माहिती दिल्यावर दुपारी सरपंच देवीदास मोरे, ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा झाला. खळ्यावरून महावितरण कंपनीची एक मुख्य वाहिनी गेली असून, शेजारीच असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत वाहक तारेला घसरून आगीची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार