भारतीय राजमुद्रेचा गैरवापर पडला महागात; खासगी ठेकेदाराविरोधात गुन्हा 

सटाणा (नाशिक) : सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करताना संबंधित ठेकेदाराने कामास कुणी विरोध करू नये, यासाठी लावलेल्या सूचना फलकावर विनापरवानगी अनधिकृतपणे भारतीय राजमुद्रा छापून गैरवापर केल्याबद्दल जलवाहिनीच्या खासगी ठेकेदाराविरोधात भारताचे राज्य चिन्हअंतर्गत सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सटाणा पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठावदे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीतचा आशय असा : सटाणा शहरांतर्गत ताहाराबाद रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सटाणा पालिकेने हे काम माधवराव तुकाराम फड (रा. परभणी) यांच्या एम. टी. फड या संस्थेस दिले आहे. हे काम सुरू असताना ठेकेदाराने त्या ठिकाणी मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे दाखल असलेल्या याचिका क्रमांक ४९०६ /२०१९ च्या अनुषंगाने झालेल्या आदेशानुसार सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामास विरोध केल्यास मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची कार्यवाही होईल, अशा मजकुरासह वरील बाजूस भारतीय राजमुद्रा प्रसिद्ध केली आहे. मात्र कोणत्याही खासगी व्यक्तीस अथवा संस्थेस कोणत्याही ठिकाणी भारतीय राजमुद्रा विनापरवानगी छापता येणार येत नाही, असे असतानाही या ठेकेदाराने विनापरवानगी बॅनरवर भारतीय राजमुद्रा छापून गैरवापर केला आहे, अशी तक्रार कोठवदे यांनी दिली. या तक्रारीच्या आधारे ठेकेदार फड यांनी भारतीय राजमुद्रा कोणत्याही प्राधिकाराची परवानगी न घेता प्रसिद्ध केल्याने भारतीय राजमुद्रेचा गैरवापर केला म्हणून सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश