भिंवडीतून कच्चा माल आणून नाशिकमध्ये बनवत होते ड्रग्ज

एमडी ड्रग कारखाना नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; साकीनाका पोलिसांनी नाशिकमधील शिंदेगावात कारवाई करून एमडी कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईनंतर कारखान्यात कच्चा माल पुरवणारा व एमडी बनवणाऱ्यास साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी शिंदे (४०, रा. नाशिक) व रोहितकुमार चौधरी (३१, रा. वसई) अशी संशयितांची नावे आहेत. भूषण पानपाटील-पाटीलच्या संपर्कातून त्यांनी भिवंडीतून कच्चा माल आणून एमडी तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Nashik Drug Case)

ऑगस्ट महिन्यात मुंबईत एका संशयिताकडून दहा ग्रॅम एमडी हस्तगत केल्यानंतर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांची धरपकड सुरू केली. त्यानुसार एकमेकांच्या संपर्कात असलेल्या दहाहून अधिक संशयितांची धरपकड करीत एमडी पकडले. तसेच ५ ऑक्टाेबरला शिंदे गावातील कारखाना उद्ध्वस्त करीत तेथून एमडी व एमडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. या कारवाईत जिशान इक्बाल शेख (३४, रा. नाशिकरोड) याला अटक केली होती. जिशानकडे केलेल्या पोलिस तपासात, शिंदेगावातील कारखाना हा ड्रग्जमाफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील चालवित होता. भूषण व त्याचा मित्र अभिषेक बलकवडे हे दोघे पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, साकीनाका पोलिसांनी पुन्हा नाशिक शहरात तळ ठोकून जिशान काम करीत असलेल्या कारखान्यात कच्चा माल पुरविणाऱ्या संशयित शिवाजी शिंदे यास ताब्यात घेतले. शहर पोलिसांच्या हद्दीत साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. तर शिंदेचा साथीदार चौधरी याला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. साकीनाका पोलिसांनी आत्तापर्यंत या कारवाईत चौदा संशयितांना अटक करून तीनशे कोटी रुपयांचे १५१ किलो एमडी हस्तगत केले आहे. दरम्यान, शिंदे याने पोलिसांंना दिलेल्या माहितीनुसार एमडी नाशिकसह ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह राज्यात व देशातील काही ठिकाणी विक्री केला जात होता. मात्र, इतर संशयितांच्या माहितीनुसार यात तफावत समोर आली आहे. त्यामुळे साकीनाका पोलिसांनी चौकशीवर जोर दिला आहे. (Nashik Drug Case)

रोहितने घेतले एमडी बनवण्याचे प्रशिक्षण

संशयित रोहितकुमार चौधरी याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, तो वसईत एका गॅरेजमध्ये काम करायचा. भूषण सोबत त्याची ओळख झाल्यानंतर रोजगार देण्याच्या आमिषाने भूषणने रोहितला नाशिकला आणले. शिंदेगावात आल्यानंतर भूषणने रोहितला एमडी बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याचे समोर आले आहे. जिशानसोबत रोहितकुमार हादेखील एमडी तयार करायचा. साकीनाका पोलिसांच्या कारवाईनंतर रोहितकुमार फरार झाला. मात्र, पोलिसांनी त्याला दिल्लीतून त्याच्या भावाच्या घरून रोहितकुमारला ताब्यात घेतले.

कच्च्या मालाची जबाबदारी शिंदेकडे

एमडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविण्याचे काम संशयित शिवाजी शिंदे हा करत असल्याचे समोर आले आहे. भिवंडी आणि नवी मुंबईतून सर्व माल गोळा करून शिंदे नाशिकला पुरवत होता. नाशिकरोड पोलिसांनी शिंदे गावात दुसऱ्या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर कांबळे, शिंदे व काळे अशी तीन संशयितांची नावे पुढे आली. त्यापैकी शिंदे हा सध्या साकीनाका पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा :

The post भिंवडीतून कच्चा माल आणून नाशिकमध्ये बनवत होते ड्रग्ज appeared first on पुढारी.