नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात दोन दिवसांपासून भिडे काही ना काही बेताल वक्तव्ये करत आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय की, त्यांच्याकडून कोणी बोलत आहेत, हे तपासण्याची गरज आहे. मंगळवारी (दि. १) मोदी महाराष्ट्रात येत असून, त्यांच्या कानावर हा विषय घातला पाहिजे. सरकारनेही भिडेंना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि. 31) केली.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर महात्मा फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले होते. भिडे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनसुद्धा मानायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करायला पाहिजे. राज्यात देशात वातावरण दूषित करण्याचे काम ते करत असून, त्याविरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले. राज्यात भिडे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद रंगला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. आज पुन्हा कारवाईची मागणी केली आहे.
भुजबळ खड्ड्यांच्या प्रश्नावर म्हणाले की, नाशिक-मुंबई हा रस्ता खड्डेमय झाला असून, मुख्यमंत्री स्वतः पाहणी करत आहेत. नाशिक-मुंबई मार्गावर मास्टिकचा प्रयोग केला जात आहे. नाशिक शहरात त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. शहरातील अनेक भागांत खड्डे पडले आहेत, मात्र सद्यस्थितीत नवीन अधिकारी आल्याने त्यांना थोडा वेळ द्यावा लागणार आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गडकरी यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलताना भुजबळ म्हणाले की, गडकरी आणि पवार यांचे जवळचे संबंध आहेत. ते एकमेकांना भेटतात, बोलतात. गडकरी का बोलले, त्याचा संदर्भ माहीत नाही, पण असे बोलून मैत्रीत वाद वाढायला नको. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार का? असे विचारल्यावर भुजबळ म्हणाले की, शरद पवार व मोदी कार्यक्रमाला एकत्र येत आहेत. लोकमान्य टिळक समितीत पवार आहेत, म्हणून ते जात असतील, पण त्यांनी जावे की नाही हे सांगण्या येवढा मी मोठा नाही.
बावनकुळेंना सर्व आधीच दिसतेय
आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे कमळाचा प्रचार करणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. याबाबत भुजबळ म्हणाले, बावनकुळे हे दादांविषयी कोणत्या आधारावर बोलले माहीत नाही. बावनकुळे यांना सर्व आधीच दिसतंय. बावनकुळे आता पंडित झाले आहेत का? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आहेत, ते राष्ट्रवादीचाच प्रचार करणार असल्याचे भुजबळांनी सांगितले.
हेही वाचा :
- सरकारी रुग्णालयांत केसपेपर, विविध चाचण्या होणार नि:शुल्क
- नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना
- पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे आज उद्घाटन
The post भिडेंना राजद्रोहाखाली अटक करा ; छगन भुजबळ यांची मागणी appeared first on पुढारी.