भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

सिडको (नाशिक) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोतील एका बिअर बारमधील तळीरामांनी वेळेची संधी साधत बिलाचे पैसै न देता धूम ठोकल्याच्या घटनेची चर्चा दिवसभर चांगलीच रंगली. 

पालकमंत्री येताच तळीरामांची धूम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमांचे पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. मात्र, हॉटेलचालक नियम धाब्यावर बसवीत असल्याचे चित्र आहे. याचीच दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःच सिडकोतील एका हॉटेल बिअर बारमध्ये पाहणी केली. पालकमंत्री येताच अनेक ग्राहकांनी बिलाचे पैसे न देताच पळ काढला. 

हॉटेलचालकाची भंबेरी
त्रिमूर्ती चौकातील कामटवाडे रोडवरील हॉटेल गांगोत्री बिअर बारमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. २७) रात्री आठच्या सुमारास पाहणी केली. त्या वेळी पोलिसांचा ताफा व पालकमंत्र्यांना पाहून मद्यप्राशन करायला बसलेले तळीरामांनी पळापळ सुरू केली. अनेकांनी हॉटेलमधून पैसे न देता काढता पाय घेतला. तर मंत्रिमहोदयांच्या प्रश्नांची उत्तरे देताना हॉटेलचालकाची भंबेरी उडाली.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

दिवसभर या चर्चेला उधाण

पालकमंत्री स्वतः लक्ष देऊन या गंभीर बाबींची दखल घेत असल्याने प्रशासन कामाला लागले. हॉटेल, बारवर होत असलेल्या कारवाईबाबत नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. यानंतर कुणीही कोरोनाच्या नियमांचे पालन करताना हलगर्जीपणा केला, तर कडक कारवाईचा इशारा पालकमंत्री भुजबळ यांनी दिला होता. दरम्यान, पैसे न देता पोबारा करणाऱ्या तळीरामांनी किस्सा दुसऱ्या दिवशी चांगलाच रंगवून सांगितला. दिवसभर या चर्चेला उधाण आले होते. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न