मंगल कार्यालय, केटरर्स व्यवसाय पुन्हा ‘लॉक’; व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले

नाशिक : जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अंशतः लॉकडाउनची घोषणा केली आहे. याचा मोठा फटका मंगल कार्यालय, लॉन्स, केटरर्स व्यवसायाला बसणार आहे. लग्नसराईत शहरात होणाऱ्या लग्नांची संख्या बघता हे नुकसान कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षीही मार्च ते जून या कालावधीत लग्नांना परवानगी नव्हती. आताही तीच परिस्थिती कायम असल्यामुळे लग्न सोहळ्यांशी निगडित व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पुन्हा रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मंगल कार्यालय, लॉन्स, केटरर्स व्यवसायावर परिणाम जाणवत असला, तसा सराफ व्यावसायिकांसह डेकोरेटर्स व्यवसायालाही तो जाणवत असल्याचे दिसत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत असताना कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने अंशतः लॉकडाउननंतर मंगल कार्यालय, लॉन्स, केटरर्स, बँड, डेकोरेटर्स व्यवसायाला केव्हा परवानगी मिळते. त्यात काय निर्बंध असतात, यावर पुढील व्यवसायाची स्थिती लक्षात येणार आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

लग्नसराईचा सीझन असून, शेतकरी वर्ग एप्रिल-मेमध्ये लग्न करतो. लग्नसराईतला मुख्य सीझन २२ एप्रिलपासून आहे. शासन प्रशासनाने पुढील विचार केला नाही, तर रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल होतील. नाशिकमध्ये २५० लॉन्स, मंगल कार्यालये आहेत. गेल्या वर्षी हा रोजगार बुडाला असून, आता झालेले बुकिंग रद्द करावे लागत असल्याची स्थिती आहे. 
-उत्तम गाढवे, अध्यक्ष, केंटरिंग असोसिएशन 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिलेल्या आदेशाचे पालन होत असून, ग्राहकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. कोरोना काळात ग्राहकांसाठी ऑनलाइन पर्याय शोधत आहे. लग्नसराई पुढे ढकलल्यामुळे आता परिणाम जाणवेल. परंतु, पुन्हा निर्बंध उठतील तेव्हा व्यवसायाची स्थिती सामान्य होऊन नुकसान भरून निघेल. 
- चेतन राजापूरकर, अध्यक्ष, सराफ असोसिएशन 

मंगल कार्यालय, लॉन्समध्ये तिथीच्या दिवशी म्हणजेच महिन्यातून साधारण आठच दिवसच समारंभ चालतात. मधल्या काळात हॉलचे आणि रूमचे पूर्ण सॅनिटाइजेशन केले जाते. घरगुती पातळीवर लग्न समारंभ करायचा ठरले, तर पाचशे ते हजार स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये कशाप्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल? सोसायटीतील इतर रहिवाशांना त्रास होऊ शकतो आणि ती सोसायटी यासाठी परवानगी देईल का, हा प्रश्‍न आहे. महिनाभरात झालेले ८० टक्के बुकिंग रद्द झाले आहे. 
- सुनील चोपडा, अध्यक्ष लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशन