मंत्री गुलाबराव पाटील ‘बिग बॉस’मध्ये जाणार; म्हणाले…

शिवसेना नेते गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस’मध्ये बोलावलं तर नक्की जावू…अशी संधी कुणाला मिळते. बिग बॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावात एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

बिग बॉस मराठीचे चौथे सिजनच्या पार्श्वभूमीवर बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी एका मुलाखती दरम्यान त्यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव घेत, हे बिग बॉसच्या घरात आल्यास बिग बॉसची टीआरपी आणखी वाढेल, असे सांगितले होते. मांजरेकरांच्या याच वक्तव्यावरून शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, त्यांनी लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्येही भाग घ्यायचो. त्यामुळे जर मला कोणी बिग बॉसमध्ये बोलावले. तर नक्कीच ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल. मी बिग बॉसमध्ये जाईन, असे सांगितले.

दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे विचार मांडणार…

दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रश्नच येत नाही. दरवर्षी बाळासाहेबांचे विचार मांडण्याचा जो प्रयत्न आम्ही करत होतो. तोच प्रयत्न आम्ही यावेळी करणार आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारस नसलो, तरी बाळासाहेबांच्या विचारांचे वारस नक्कीच आहोत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

The post मंत्री गुलाबराव पाटील 'बिग बॉस'मध्ये जाणार; म्हणाले... appeared first on पुढारी.