मंत्री गुलाबराव पाटील : मी दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस, मी द्विअर्थी बोलणारच

शिवसेना नेते गुलाबराव पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे रोखठोक भाषणशैलीमुळे ओळखले जातात. जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर टीका करताना जोरदार टोलेबाजी केली. “मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच, मी मुकं मुकं बोललो, तर मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल, असं मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धानोरा येथे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन करण्यासाठी आले असताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, माणूस चार अर्थाने बोलतो, पण हा एकच अर्थ काढतात. माझी अपेक्षा आहे की, मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच. मी मुकं मुकं बोललो, तर मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल. योगायोगाने चुकून या धंद्यात आलो मी कीर्तनकार असतो तर यापेक्षाही मोठी गर्दी झाली असती. पण बाळासाहेबांच्या कृपेने आपलं दुकान बरं चाललं आहे, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी भाषण केले.

आमचं नाव अलीबाबा ४० चोराप्रमाणे झालं…

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सर्वांचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री झाला आहे. मात्र, आमचं नाव अलीबाबा आणि चाळीस चोराप्रमाणे झालं आहे. आमची बदनामी सुरू आहे. आम्ही जे केलं ते सदसदविवेक बुद्धीने केलं आहे, बाळासाहेबांसाठी, भगव्या झेंड्यासाठी, राज्याचं भलं व्हावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.

आता राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही…

पूर्वी राजाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा राजा व्हायचा. मात्र आता राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही, तर राजा हा जनतेच्या मतदानातून जन्माला येतो, त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहो. पन्नास हजार मतांनी आम्ही निवडून आलेलो आहोत. म्हणून तर कोणी ऐरे गैरे नथ्थू खैरे आम्हाला पाडून टाकू असे बोलतायेत… मात्र शंभर दिवस जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखा जगा. हेच शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.

हेही वाचा:

The post मंत्री गुलाबराव पाटील : मी दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस, मी द्विअर्थी बोलणारच appeared first on पुढारी.