
जळगाव: पुढारी वृत्तसेवा
जामनेर तालुक्यात गुरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्याची गंभीर दखल घेत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मंगळवारी (दि. 13) सकाळी पहूर येथे तातडीने रवाना केले. तसेच गुरांवर लम्पी लसीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी शासन स्तरावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या गुरांचा पंचनामा करून तत्काळ १० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
जामनेर तालुक्यातील पहूर येथे मंगळवारी (दि. 13) जिल्हाधिकारी राऊत यांनी येथील ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशुपालकांची संयुक्त बैठक घेतली. यात राऊत यांनी लम्पी आजाराविषयी माहिती दिली. तसेच गुरांचे तत्काळ लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी ग्रामपंचायतीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पहूर कसबे येथील लम्पी आजाराने बाधित गुरांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. पहूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्याशी चर्चा करून येथील परिस्थितीबाबत माहिती घेतली. रुग्णालयात लवकरात लवकर अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध करून देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी सरपंच नीता पाटील, सरपंच शंकर जाधव, अरविंद देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, उपसरपंच राजू जाधव, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांच्यासह ग्रामस्थ व पशुपालक उपस्थित होते.
हेही वाचा:
- उत्तर पुणे जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव, अतिदुर्गम आदिवासी भागातील जनावरांचे लसीकरण
- पुणे : पाऊस काही पाठ सोडेना; लोणी-धामणी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
- अमृता फडणवीस यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी महिलेला अटक
The post मंत्री महाजन यांचे लम्पीबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश, जामनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on पुढारी.