नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता असून देखील आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भर पावसात जाऊन इर्शाळगडाच्या संकटग्रस्तांची आणि मृतांच्या नातलगांची अस्थेवाईक चौकशी केली तसेच शासनाकडून सर्व सहाय्य मिळवून देण्याचे आश्वासित केले.
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी लोकवस्तीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात होती. तथापि ९८ व्यक्तींना शोधण्यात यश आले आहे. जखमींवर नवी मुंबई येथे उपचार सुरू आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, भर पावसात घटनास्थळी जाऊन महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जखमींची आणि संकटग्रस्तांची भेट घेतली. आस्थेने चौकशी करून त्यांच्या उध्वस्त झालेल्या जीवनाला आधार मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरड कोसळली ती वसाहत आदिवासीबहुल होती.
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे अडथळा येत असतानाही आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही भेट दिली. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेने ताबडतोब धावपळ करून मदत कार्य गतिमान केले. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून पॅकेट देण्यात आले. त्याच बरोबर ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देण्यात आले.
संकटग्रस्तांना चौकशी करून ही मदत मिळत असल्याविषयी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी माहिती घेतली तसेच सूचना दिल्या. तत्पूर्वी नजीकच्या सर्व गावातील व शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सेवाभावी संघटना घटनास्थळी धावून आल्या. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य मंत्री यांनीही भेट देत मदत कार्य गतिमान केले शासकीय नुकसान भरपाईची घोषणा केली.
The post मंत्री विजयकुमार गावित यांनी इर्शाळगडाच्या दरडग्रस्तांची घेतली भेट appeared first on पुढारी.