मंदिराची कवाडे उघडणार! सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांत उत्साह 

दहीवड (जि.नाशिक) : गाव म्हणजेच बाजारपेठ... गाव म्हणजेच व्यावसायिकांचे आर्थिक सुबकतेचं माध्यम... मंदिर सप्तशृंग शिखरावर असल्याने भाविकांचा मंदिरात जाण्यासाठी गावातूनच होणारा प्रवेश, भाविकांकडून मंदिरात जाताना ओटी प्रसाद साहित्याची होणारी खरेदी, यामुळे येथील व्यावसायिकांचा याच अर्थकारणावर चालणारा उदरनिर्वाह. हे सर्व चित्र आठ महिन्यांपासून येथे बघावयास मिळत नव्हते. परंतु शनिवारी (ता.१४) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १६) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर सुरू होणार असल्याची घोषणा केल्यानंतर सप्तशृंगगड परिसरातील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांत उत्साह 

गडावर शेतीपयोगी जमीन नसल्यामुळे येथील ग्रामस्थांचा साडी, ओटी, प्रसाद, खेळणी व इतर साहित्याच्या विक्रीच्या दुकानांवरच उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही रद्द झाला होता. त्यामुळे सात महिने पुजारी वर्गासोबतच व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली. अनवाणी पाय; पण चेहऱ्यावर मंद स्मितहास्य, अशी देहबोली असलेल्या आदिवासी महिला हातातील ओटीपूजेच्या साहित्याची सप्तशृंगगड येथे हातविक्री करतात. यासाठी देवीभक्तांना विनवणी करून ओटी साहित्याची विक्री करत. परंतु या आदिवासी महिलांचे मंदिर बंदच्या काळात हाल झाले तसेच त्यांच्यावर दुसरीकडे काम शोधण्याची वेळ आली. मात्र आता मोठ्या विश्रांतीनंतर मंदिर सुरू होणार असल्याची घोषणा होताच सप्तशृंगगड परिसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांनी ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत त्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण दिसून आले. तसेच व्यावसायिकांची दुकानात साफसफाई करतानाची लगबग दिसून आली. 
 

मंदिर बंदच्या काळात गडावरील व्यावसायिक तसेच आदिवासी बांधवांची आर्थिक घडी विस्कटली होती. हाताला काम नसल्यामुळे अनेकांनी परगावी जाणे पसंत केले. आज मुख्यमंत्री महोदयांनी मंदिर सुरू करण्याचा जो निर्णय घेतला, तो स्वागतार्ह आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या व्यावसायिकांना विस्कटलेली आर्थिक घडी बसविता येणार आहे. - संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते 
 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर सुरू होणार, ही बातमी कानी पडली आणि आम्हा व्यावसायिकांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. आठ महिन्यांपासून आम्ही आर्थिक विवंचनेत होतो. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी शनिवारी मंदिर सुरू होण्याबाबतची घोषणा केली. त्यामुळे आम्हाला आमचा व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार आहे. मंदिर सुरू करण्याबाबतची घोषणा आम्हा व्यावसायिकांसाठी एक प्रकारची दिवाळी भेटच आहे. - राजू आष्टेकर, व्यावसायिक, सप्तशृंगगड 

 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल