मंदी असतानाही ‘या’ चार क्षेत्रांत कोरोनानंतरही उत्साह! विक्रीत मोठी उसळी

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मुद्रांक शुल्कातील सवलतीने बांधकाम क्षेत्राला, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला, कोलमडलेल्या बस वाहतूक यंत्रणेमुळे वाहनांना, तर ‘वर्क फ्रॉम होम’ व ऑनलाइन क्लासेसमुळे मोबाईल, लॅपटॉप विक्रेत्यांना कोरोना काळ इष्टापत्ती ठरली. कोरोनामुळे इतर सर्व क्षेत्राला मंदीने घेरले असताना या चार क्षेत्रांत मात्र कोरोनानंतरही उत्साहाचे वातावरण आहे. 

मंदी असतानाही चार क्षेत्रांत कोरोनानंतरही उत्साह!

कोरोनाचा परिणाम होऊन अर्थव्यवस्था गडगडलेली असताना कोरोनानंतरही बांधकाम क्षेत्रात घरे व जागा खरेदीत वाढ झाली. कोरोनाच्या काळात अनेक मजूर बांधकामे अपूर्ण ठेवून गावी परतले होते. बांधकाम क्षेत्रावर या कोरोनाच्या आपत्तीचा दुर्गामी परिणाम होईल, असे जाणकारांचे अंदाज होते. मात्र, या अंदाजाला छेद देत कोरोनाची लाट ओसरताच बांधकाम क्षेत्र अधिक मजबुतीने उभे राहिल्याचे दिसते. प्रधानमंत्री आवास योजना व मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत बांधकाम क्षेत्राला वरदान ठरली आहे. पिंपळगाव बसवंत व ओझरमध्ये दोन महिन्यांत सुमारे एक हजार स्थावर मालमत्तेचे व्यवहार झाले असून, यातून रिअल इस्टेटला झळाळी मिळाली आहे.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

कोरोनात घर, वाहने, सोने, मोबाईल, लॅपटॉपला झळाळी 

अतिसुरक्षित गुंतवणूक व अडचणीच्या काळात मदतीला येणारी सोने खरेदी कोरोनानंतर चमकलेली दिसते. छाया ज्वेलर्सचे जितेंद्र मुथा यांच्या म्हणण्यानुसार कोरोना काळात बंद असलेल्या सहली या खर्चातून झालेली बचत तसेच बँकांच्या बेभरवशामुळे सोने खरेदीत वाढ झाली असून, वाढीव भावामुळे गुंतवणूकदारांचा कल सोने खरेदीकडे राहिला. पन्नास हजार रुपये प्रतितोळा अशी सोन्याच्या दरात उसळी येऊनही द्राक्षनगरीमधील सराफी पेठेत खरेदीदारांचा ओघ कायम आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

विक्रीत सर्वाधिक वाढ
बंद असलेल्या बससेवेतून नोकरीच्या किंवा इच्छितस्थळी पोहचण्यासाठी स्वत:च्या वाहनाशिवाय पर्याय नाही, याची खात्री झाल्याने वाहन खरेदीत ग्राहक मागे नव्हते. कोरोनाच्या भीतीमुळे गर्दी टाळण्यासाठी व अत्यावश्‍यक गरज बनल्याने दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही मॉडेलमध्ये दहा टक्क्यांनी किमती वाढल्या असून, दोन ते तीन महिने प्रतीक्षा करूनही वाहन मिळत नसल्याचे वाहन विक्रेते सांगतात. 
ऑफिसचे काम किवा विद्यार्थ्यांचा अभ्यास अजूनही बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन सुरू आहे. ऑनलाइनसाठी लागणारे मोबाईल, लॅपटॉप यांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे. नव्याच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने जुन्या गॅझेटला मोठी मागणी वाढली. एकूणच कोरोनानंतर काही व्यवसाय अखेरचा श्‍वास घेत असताना रिअल इस्टेट, सोने, ऑनलाइन गॅझेटच्या विक्रीत मोठी उसळी आली आहे. 

कोरोनानंतर ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ऑनलाइन कामकाजासाठी लॅपटॉप, मोबाईल ही अत्यावश्‍यक वस्तू बनली आहे. कधी नव्हे एवढी तिपटीने मागणी झाली. दरात वाढ झाल्याने जुन्या लॅपटॉपलाही पसंती मिळत आहे. 
- संदीप वाटपाडे, समर्थ कॉम्प्युटर्स, पिंपळगाव बसवंत