मकर संक्रांतीनिमित्त दै. ’पुढारी’चा उपक्रम :चला करू या वृत्तपत्र विक्रेत्यांची पहाट गोड!

वृत्तपत्र www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’च्या वतीने रविवारी (दि. 15) नाशिक शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ऊन, थंडी, पाऊस आणि कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा स्वत:च्या जीवाची बाजी लावत घरोघरी वृत्तपत्र वाटप करणार्‍या विक्रेत्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘पुढारी’ने हा नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला आहे.

भल्या पहाटे स्वत:ची साखरझोप मोडत वाचकांच्या घरी वृत्तपत्र पोहोचवून त्यांची पहाट गोड करण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करत असतात. जगभरातील इत्थंभूत घडामोडींची माहिती घरबसल्या वाचकांना वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळते. हेच वृत्तपत्र वाचकांच्या हाती सोपवून वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते नेहमीच करत असतात. अशा वृत्तपत्र विक्रेत्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने दै. ‘पुढारी’ ने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. याउपक्रमांतर्गत मकरसंक्रांतीच्या दिवशी भल्या पहाटे शहरातील सर्व विक्रेत्यांना दै. ‘पुढारी’च्या वतीने तिळगूळ वाटप केले जाणार आहे. तसेच, नाशिक शहरातील महिला विक्रेत्यांनाही ‘वाण’ देऊन शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. वाचकांनीही या अनोख्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरी भल्या पहाटे वृत्तपत्र घेऊन येणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्याला तिळगूळ देऊन त्यांची ऊर्जा वाढवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे.

वृत्तपत्र विक्रेता हा एकमेव असा घटक आहे की, जो वर्षाचे बाराही महिने कशाचीही तमा न बाळगता आम्हा वाचकांपर्यंत भल्या पहाटे नियमित वेळेत वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करतो. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या उपक्रमात सहभागी झालो आहोत, असे या उपक्रमाचे प्रायोजक ‘वॉव ऑर्गनायझेशन’ च्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post मकर संक्रांतीनिमित्त दै. ’पुढारी’चा उपक्रम :चला करू या वृत्तपत्र विक्रेत्यांची पहाट गोड! appeared first on पुढारी.