मका खरेदीसाठी जिल्ह्याला ५६ हजार क्विंटलचे उद्दिष्ट! हमीभावाच्या खरेदीचा पेच सुटला

येवला  (जि. नाशिक) : केंद्र शासनाच्या परवानगीनंतरही रखडलेल्या शासकीय हमीभावाच्या मका खरेदीचा मुहूर्त अखेर निश्‍चित झाला आहे. राज्याला चार लाख ५४ हजार क्विंटलचे नव्याने खरेदीचे उद्दिष्ट दिल्याने त्याचे जिल्हानिहाय वाटप झाले असून, नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला ५६ हजार क्विंटल उद्दिष्ट आले आहे.

सोमवारपासून पूर्ववत खरेदी सुरू

शुक्रवारी (ता.१५) जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी जिल्ह्यातील नऊ संस्थांना त्यांच्या खरेदीचे उद्दिष्ट वाटप केले असल्यामुळे खरेदीचा पेच सुटला असून, आता सोमवारपासून पूर्ववत खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्र शासनाने भरड धान्य खरेदीसाठी राज्याला चार लाख १२ हजार क्विटल खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. ही खरेदी साधारणत: १८ नोव्हेंबरनंतर सुरू झाली. तर १६ डिसेंबरला उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदीचे पोर्टल बंद झाले होते. त्यानंतर राज्य व केंद्र शासन स्तरावर पूर्ववत खरेदीचा घोळ सुरू राहिल्यानंतर अखेर २५ दिवसांनंतर सोमवारी (ता.१८) पूर्ववत खरेदीचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. मात्र, यासंदर्भात राज्य शासनाच्या पातळीवर घुळघुळ सुरू असल्याने खरेदी पूर्ववत सुरू होण्यास आठवडाभरची दिरंगाई होत आहे.

पेच सुटला; तालुकानिहाय उद्दिष्ट निश्‍चित

गुरुवारी (ता.१४) अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातल्या खरेदीदार संस्था असलेल्या राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व सहकारी आदिवासी विकास महामंडळाला त्यांच्या खरेदीचे उद्दिष्ट वाटून दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्याला मार्केटिंग फेडरेशनच्या अंतर्गत ५६ हजार, तर आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत चार हजार क्विंटलचे उद्दिष्ट नव्याने देण्यात आले. 
त्यानंतर आज भरड धान्य खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी जिल्ह्यातील खरेदीदार संस्थांना त्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. याअंतर्गत सर्व संस्थांनी १६ डिसेंबरला शिल्लक असलेले लॉटची सर्वप्रथम पोर्टलवर नोंदणी करायचे असून, त्यानंतर उद्दिष्ट शिल्लक असल्यास प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना मेसेज देऊन बोलून घ्यायचे आहे. यापूर्वी ऑनलाइन नोंदणी झालेल्यांचा खरेदीला विचार होणार असून, नव्याने नोंदणी होणार नाही. तसेच ३१ जानेवारीनंतर ऑनलाइन पोर्टल सुरू होणार नसल्याने तत्पूर्वी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत. मकासह जिल्ह्याला ज्वारी खरेदीसाठी ८४१ क्विंटल, तर बाजरी खरेदीसाठी १४ हजार २१८ क्विंटल उद्दिष्ट वाढवून मिळाले असून, प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना मकासह ज्वारी व बाजरी हमीभावाने विक्री करता येणार आहे. 

हेही वाचा >  लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

जिल्ह्यातील नऊ संस्थांना शिल्लक शेतकऱ्यांची मका, ज्वारी, बाजरी खरेदीबाबत उद्दिष्टे निश्‍चित करून दिले आहे. यासंदर्भातची नियमावली या संस्थांना कळविण्यात आली असून, मेसेज पाठवलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने खरेदी होईल. खरेदीसाठीचे उद्दिष्ट निश्‍चित केल्याने तेवढी खरेदी ३१ जानेवारीपूर्वी करायची आहे. कुणाची खरेदी कमी झाल्यास त्या संस्थेकडील खरेदी दुसऱ्या संस्थेकडे वर्ग करण्यात येईल. 
- विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

असे मिळाले मका खरेदीचे उद्दिष्ट (क्वि.) 

खरेदी केंद्र - झालेली खरेदी - वाढीव उद्दिष्ट 
सिन्नर - ९१४५ - ६००० 
येवला - १९५९० - ९००० 
लासलगाव - ८५१२ - ७५०० 
चांदवड - ६६६१ - ७५०० 
मालेगाव - १०९२६ - ७५०० 
सटाणा - ४८७४ - ५००० 
नामपूर - ७०३ - ३००० 
देवळा - ६२२९ - ७५०० 
नांदगाव - ६५७१ - ३००० 
एकूण - ७३२१४ - ५६०००.