मक्याच्या भावात द्राक्षाचे सौदे! शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कष्टाने पिकविलेल्या द्राक्षांना बाजारभावाअभावी गोडवा राहिलेला नाही. निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेत दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. कधी नव्हे दरात एवढी पडझड झाली आहे, की मक्याच्या भावात द्राक्षाचे सौदे सुरू झाले आहेत. फळपिक आहे की भुसार माल, अशी द्राक्षांची अवस्था झाली आहे. द्राक्ष परिपक्व झाल्याने दरवाढीची प्रतीक्षाही करू शकत नाही किंवा त्याची श्‍वाश्‍वती नाही. सौदे केले तर काही व्यापारी परराज्यात धूम ठोकत असल्याने शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. 

मक्याच्या भावात द्राक्षाचे सौदे 
यंदाचा द्राक्ष हंगाम अवकाळी पावसासह संकटाची मालिकाच घेऊन आला. अवकाळीने जानेवारीपर्यंत पाठ सोडली नाही. या संकटाशी झुंज देऊन शेतकऱ्यांनी द्राक्षबागा फुलविल्या. एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च केले. हंगामाकडून अपेक्षा असताना सुरवातच निराशाजनक झाली. स्थानिक बाजारपेठत द्राक्षाला प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दर मिळाले. तापमान वाढल्यानंतर दरात सुधारणा येईल, अशी अपेक्षा होती. तशी चिन्हही दिसत होती. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले
द्राक्ष उत्पादकांमागील शुक्लकाष्ट कमी होण्याचे नाव घेत नाही. कोरोनाने पुन्हा हातपाय पसरवायला सुरवात केल्याने लॉकडाउन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शहरांमध्ये आठवड्यातून दोन दिवसांचे टाळेबंदी झाली आहे. त्या मुळे जनजीवन पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच भीती द्राक्षव्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दाखविली जात आहे. लॉकडाउनच्या भीतीने ग्रेप्स इंडस्ट्री हादरली आहे. गेल्या वर्षीचा लॉकडाउनच्या तडाख्यातून यंदा सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

२५ रुपये दराने खरेदी 
द्राक्ष हंगाम सध्या ऐनभरात आला आहे. पण दराने मात्र निराशा केली आहे. अवघे २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षांचे सौदे होत आहेत. कधी नव्हे एवढा नीचांकी दर शेतकऱ्यांना मिळतो आहे. निर्यातीचे दर कोसळल्याने त्यांचा फटका स्थानिक द्राक्षांना बसला आहे. 

 

निर्यातीबरोबर स्थानिक भाव कोसळल्याने शेतकरी हतबल 
गेल्या वर्षी कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यंदाही लॉकडाउनची भीती दाखवून व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. शेतकऱ्यांवरील कर्ज पाहता निफाडसारख्या बागायती परिसरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती आहे. -माधवराव ढोमसे, माजी संचालक, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत