मक्यासह ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; तर हरभरा घाटेअळी अन्‌ मररोगाच्या फेऱ्यात

नाशिक : यंदा वरुणराजाने चांगली हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक वाढ झाली आहे. पण गेल्या आठवड्यातील ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे मक्यासह ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभऱ्याला घाटेअळी अन् मररोगाने घेरले आहे. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले असले, तरीही कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनातील घट ठरलेली आहे. 

राज्यात भात आणि नाचणीच्या खरिपातील पिकांची कापणी व मळणीची कामे अंतिम टप्प्यात पोचली आहेत. कापूस बोंड लागणे ते पक्वतेच्या अवस्थेत असून वेचणी सुरू आहे. तूर शेंगा धरणे ते शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, काढणी सुरू आहे. अशातच, सध्याच्या हवामानामुळे कापसावर अमेरिकन बोंड, गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, तुरीवर घाटेअळी, शेंग माशी व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दरम्यान, डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत गेल्या वर्षी रब्बीच्या राज्यात ६७.३६ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा आतापर्यंत ८३.६९ टक्के पेरण्या उरकल्या आहेत. मात्र ज्वारी, करडई, सूर्यफुलाचे क्षेत्र अद्याप गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आणि यंदा आतापर्यंत पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये (कंसात गेल्या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये) : ज्वारी- २० लाख २७ हजार २५८- १४ लाख ५९ हजार ४०६ (१४ लाख ६६ हजार ९९७), गहू- आठ लाख ७५ हजार ६३३- सहा लाख ७१ हजार ४८२ (चार लाख ३० हजार ६६३), मका- दोन लाख ६३ हजार ८९६- एक लाख ६६ हजार ८१५ (एक लाख सात हजार ४९८), हरभरा- १७ लाख ४३ हजार २५९- १८ लाख ५८ हजार ६८५ (१३ लाख ४० हजार ३६१), करडई- ४६ हजार ४६५- १४ हजार ६३४ (१६ हजार १६६), जवस- १६ हजार ६६९- चार हजार २९९ (पाच हजार १२०), तीळ- तीन हजार ६३०- ९५१ (९०), सूर्यफूल- १४ हजार ४१६- एक हजार ७२६ (दोन हजार २६७). 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

नाशिक विभागात ६८ टक्के पेरणी 
नाशिक विभागात रब्बीचे क्षेत्र चार लाख ६७ हजार हेक्टर इतके असून, आतापर्यंत तीन लाख १८ हजार हेक्टरवर म्हणजेच ६८.१५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मका, हरभरा पिकांवर रोगकिडीने थैमान घातले आहे. ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, मोहरी पिकांची पेरणी सुरू आहे. पेरणी झालेली पिके उगवण ते रोपांच्या अवस्थेत आहेत. 

एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित 
अवकाळी पावसाने सोमवार (ता. १४)पर्यंत राज्यातील एक हजार २७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात पिके आणि फळबागांचा समावेश आहे. द्राक्षे, आंबा, तूर, रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. द्राक्षांचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांच्या नुकसानीचे प्रमाण एक हजार कोटींच्या पुढे पोचले आहे. शिवाय जिल्ह्यातील कांद्याचे बाराशे कोटींपर्यंत नुकसान झाले आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ