…मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

बाळासाहेबांनी यांना मोठं केलं. परंतु आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली. मात्र, तुम्ही आमचे आई -बाप काढता. आम्ही मात्र, शिवसेना येके शिवसेना करत राहिलो. कधी वेळ काळ पाहिला नाही. शिवसेना अशीच मोठी झाली नाही, बाळासाहेबांनी कार्यकर्ते तयार केले त्यातून शिवसेना मोठी झाली. कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याचा माझा स्वभाव नाही. परंतु ज्या राष्ट्रवादी व कॉंग्रेसला बाळासाहेबांनी थारा दिला नाही त्यांना तुम्ही जवळ केले. तुम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेशी विश्वासघात केला. मुंबईत दाऊदने बॉम्बस्फॉट घडवले. दाऊदशी कनेक्शन निघाले अशा मंत्र्यांना तुम्हाला पाठिशी घालण्याची वेळ आली. मग सांगा गद्दारी तुम्ही केली की आम्ही केली? असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

मालेगाव येथे एकनाथ शिंदे बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले माझ्या आणि त्यांच्यातील काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार नाही. पण जसजसं समोरुन बोलणं होईल तसतसे मलाही तोंड उघडावं लागेल, भूकंप करावा लागेल. असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता दिला. शिंदे म्हणाले, मी आजवर कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन बोललो नाही. बाळासाहेबांनी अन्यायाविरोधात पेटवून उठा अशी शिकवण दिली. त्यामुळे त्यांची शिकवण आम्ही जपू. एवढच काय तर स्मिता ठाकरे व निहार ठाकरे यांनीही मला शुभेच्छा दिल्याचे शिंदे म्हणाले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील सिनेमा हा फक्त उदाहरण आहे. प्रत्यक्षात ज्या गोष्टी घडल्या त्याचा मी साक्षीदार आहे. योग्य वेळ येईल तेव्हा नक्की बोलेल. असा सूचक इशारा त्यांनी दिला. आम्हाला संपूर्ण राज्यातून समर्थन मिळतय. जर आम्ही चुकलो असोत तर लोकांनी आम्हाला बघून तोंडं फिरवली असती. मात्र तसे झाले नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. .

जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवे होते.  ते आम्ही आता केले. कोणी काहीही म्हणू द्या परंतु देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी आम्हाला पाठिंबा दिला. विकास निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास दिला. मोदींकडून कौतुकाची थाप मिळाल्याचे खडसे म्हणाले.

रिक्षावाले फेरीवाले यांच्यासाठी महामंडळांची घोषणा

राज्यातील रिक्षावाले व फेरीवाले यांच्यासाठी लवकरच महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. उदय सामत व दादा भुसेंवर या महामंडळाची जबाबदारी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रिक्षावाले व फेरीवाले यांच्या समस्यांना सरकार प्राधान्य देईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

मालेगाव जिल्हानिर्मितीची मागणी मोठी आहे. त्यावर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी पाठपुरावा करु, त्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली आहे. मालेगाव जिल्हानिर्मितीच्या मागणीला घेऊन सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

The post ...मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा appeared first on पुढारी.