मणिपूर प्रकरणावर नंदुरबारमध्ये संतप्त प्रतिक्रिया; ‘आप’ करणार आदिवासींच्यावतीने निदर्शने

Manipur Violence

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील महिला अत्याचार आणि हत्या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीकडून जिल्ह्यातील संतप्त आदिवासींच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. जलद न्याय करून याप्रकरणी दोषी गुन्हेगारांना सर्वाधिक कडक शिक्षा सुनवावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवी गावित यांनी निवेदनाद्वारे केली.

मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराचे छायाचित्र वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम भागात संतप्त लाट उसळली आहे. विविध आदिवासी संघटना आणि राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात सरसावले असून प्रशासनाकडे धाव घेऊ लागले आहेत. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर येथील तहसीलदार यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष रवी गावित, जिल्हा सचिव अरविंद वाळवी, जिल्हा संघटक मंगेश येवले यांच्या वतीने कार्यकर्त्यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

निवेदनात या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटले आहे की, मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे. तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्रीय भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलेली नाही, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे. हे अत्यंत घृणास्पद घडत असतानाच मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही अत्यंत संतापजनक घटना आहे. तसेच, खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहेत. या विरोधात आम आदमी पार्टी संतप्त आदिवासींच्या वतीने राज्यभर निदर्शने करणार आहे. परंतु महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर घटनेबाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाध्यक्ष रवी गावित यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी. तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे केली आहे.

The post मणिपूर प्रकरणावर नंदुरबारमध्ये संतप्त प्रतिक्रिया; 'आप' करणार आदिवासींच्यावतीने निदर्शने appeared first on पुढारी.