मध्यरात्रीचा खेळ! बोटींपाठोपाठ आता चायनीज गाड्या जाळल्या; नागरिकांत भीती

पंचवटी (नाशिक) : गांधी तलावाशेजारी ठेवलेल्या बोटी जाळण्याचा प्रकार घडलेला असताना गुरुवारी (ता. २६) मध्यरात्री पुन्हा गाडगे महाराज पुलाखाली ठेवलेल्या तीन चायनीजच्या गाड्या समाजकंटकांनी पेटवून दिल्या. त्या मुळे गोदाघाटावरील गुन्हेगारीचा विळखा पुन्हा घट्ट होतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. 

मध्यरात्री जाळल्या तीन चायनीज गाड्या 
अनिता राऊत यांच्या मालकीच्या तीन चायनीजच्या गाड्या खंडेराव महाराज मंदिराच्या मागील बाजूस लावल्या जातात. गुरुवारी (ता. २५) रात्री व्यवसाय झाल्यावर गाड्या लावून संबंधित घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी या गाड्या ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. दोन-तीन दिवसांपूर्वी गांधी तलाव परिसरात ठेवून दिलेल्या बोटी अज्ञात व्यक्तींनी जाळण्याची घटना घडलेली असतानाच आता पुन्हा जाळपोळीचे सत्र अवलंबविण्यात आले आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी त्या मुळे गंगाघाटावरील शांततेस गालबोट लागल्याचे दिसून येते. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

परिसरात अनेक जुगार अड्डे 
गंगाघाटाच्या दुतर्फा, तसेच नवीन शाहीमार्ग परिसरात अनेक जुगार अड्डे सक्रिय आहेत. याठिकाणी समाजकंटकांचा कायम वावर असतो. मात्र, याठिकाणाहून पोलिस ठाणे दूर असल्याने गुन्हेगारांचे फावत असल्याचे चित्र आहे. पंचवटी स्मशानभूमीच्या परिसरात मध्यंतरी दुचाकीस्वाराला अडवून बेदम मारहाण करत मोबाईल व रोकड पळविण्यात आली होती. रात्री याभागात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ