मध्यरात्री रस्त्याजवळ अज्ञातांनी आणला शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसरात खळबळ

येवला (नाशिक) : कुठलीही चर्चा किंवा परवानगी नसताना शुक्रवारी मध्यरात्री राजापूर (ता. येवला) येथील वर्दळीच्या चौफुलीवर रस्त्यालगतच अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा आणून बसविला. या घटनेने एकच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र ग्रामस्थांची समजूतदार भूमिका आणि प्रशासनाने हाताळलेल्या परिस्थितीमुळे हा विषय शांततेत मिटला आणि परवानगी नसल्याने प्रशासनाने पुतळा आपल्या ताब्यात ठेवला आहे.

ग्रामस्थांच्या प्रकार निदर्शनास येताच एकच खळबळ

येवला-नांदगाव व ममदापूर-सोयगाव रस्त्यावरील चौफुलीवर रस्त्यालगतच मध्यरात्री १५ फूट उंचीचा पुतळा विनापरवानगी बसविण्यात आला. शनिवारी (ता. २१) सकाळी ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधीक्षक समीरसिंग साळवे, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी व तहसीलदार प्रमोद हिले यांनीही गावात येऊन माजी सरपंच प्रमोद बोडके, परशराम दराडे, दयानंद जाधव, लक्ष्मण घुगे, पोपट आव्हाड, समाधान चव्हाण, विठ्ठल मुंडे, शरद वाघ, शंकर मगर, संजय वाघ, ग्रामविकास अधिकारी रामदास मंडलिक आदींशी चर्चा करत संभाव्य तोटे टाळण्यासाठी पुतळ्याबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी करत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर एकमताने पुतळा काढून क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये ठेवून येवल्यात आणला.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?