नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे सकारात्मक परिणात आता दिसु लागले आहेत. गेल्या वर्षभरातच महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्येत तब्बल १९६४ ने भर पडली आहे. इतकेच नव्हे तर, या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीतही १२ टक्क्यांनी वाढली आहे. स्मार्ट शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागल्याचे यातून दिसून येत आहे.
महापालिकेच्या माध्यमातून शहरात ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. खासगी शाळांमधील महागडे शिक्षण गोरगरीबांना परवडत नाही, अशा वेळी महापालिकेच्या शाळा या गोरगरीबांसाठी वरदान ठरल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या शाळांची दूरवस्था, ज्ञानदानात शिक्षकांची अनास्था आणि शिक्षण विभागाचे झालेले दुर्लक्ष यामुळे महापालिकेच्या शाळांना गळती लागली होती. खासगी शिक्षणसंस्थांकडून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू होती. शिक्षणाचा दर्जा खालावल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते; परंतू गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभागाने कात टाकली आहे. त्यात महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आलेला स्मार्ट स्कूल प्रकल्प महापालिकेच्या शाळांचा कायापालट करणारा ठरला आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील केवळ गळतीचे प्रमाण कमी झाले नाही तर विद्यार्थी संख्येतही वाढ झाली आहे.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या २५,१२३ इतकी होती. त्यात वर्षभरातच १,९६४ ने वाढ झाली असून २०२३-२४या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या २७,०८७ वर पोहोचली आहे. स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे ८२ शाळशंमधील ६५६ वर्गखोल्यांमध्ये सुरू झालेले डिजिटल शिक्षण तसेच शालेय पोषण आहार, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांचे आधार संलग्निकरण आदी बाबींमुळे विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे.
विद्यार्थी गळतीचे प्रमाणही घटले
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाणही गेल्या वर्षाच्या तुलनेत ६२ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याचबरोबर शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढली आहे. २०२२-२३ मध्ये एकूण २५,१२३ विद्यार्थी संख्या असली तरी प्रत्यक्ष उपस्थिती मात्र २३,१४३ इतकी होती. २०२३-२४मध्ये विद्यार्थी संख्या २७,०९७ असताना प्रत्यक्ष उपस्थिती २५,९३८ इतकी राहिली. गतवर्षीच्या तुलनेत उपस्थितीचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले.
महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी भर दिला जात आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली आहे.
– बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका.
हेही वाचा :
- Amin Sayani : अमीन सयानी यांना राज्यपालांकडून श्रद्धांजली
- Sunny Leone : सनी लिओनी प्रभुदेवासोबत “पेट्टा रॅप” डान्स नंबरमध्ये!
- वणव्यामुळे लाकडाच्या गोदामाला लागली आग; पाली-खोपाली मार्गावरील घटना
The post मनपा शाळांमधील उपस्थितीत १२ टक्क्यांनी वाढ appeared first on पुढारी.