मनमाडकरांना पडला कोरोनाचा विसर! प्रशासनासह नागरिकही बिनधास्त 

मनमाड (नाशिक) : कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात असून शासनातर्फे नियोजन केले जात असले तरी नागरिक अजूनही बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे होणारे ऑनलॉक आणि दुसरीकडे नागरिकांचा विना मास्कचा मुक्तसंचारामुळे कोरोनाचा पुन्हा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मनमाड शहर परिसरात प्रशासनासह नागरिकांनाही गांभीर्य असल्याचे दिसत नाही.

नागरिकांना कोरोनाचा विसर

कोरोनाच्या पहिल्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला असतांनाच आता दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली असली तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. मात्र बिनधास्त झालेल्या नागरिकांना कोरोनाचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जवळपास तीस टक्के नागरिकच मास्कचा वापर करत आहेत. काही नागरिक केवळ गळ्यात मास्क लटकवून फिरतांना दिसतात. तर काही दिवसांपासून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसत आहे. कोरोना संसर्गजन्य आहे. त्यातच थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्ण संख्येत वाढवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मनमाड शहरात नागरिकांकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. गेल्या महिनापासून कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडाही खाली आला आहे. 

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

नागरिकांचा सर्वत्र मुक्त वावर

त्यातच मंदिर, वाहतूक, बाजारपेठ, व्यवसाय, लग्न, समारंभ सुरू झाल्यामुळे गर्दीमध्ये भर पडत आहे. नागरिक विना मास्क मुक्त संचार सुरू आहे. परिणामी कोरोना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर प्रशासनालाही गांभीर्य नसून अंमलबजावणी होत नाही. कायद्याची उघड पायमल्ली केली जात आहे. मास्क बांधणे बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास दंड ठोठावला जाणार अशी घोषणा झाली. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक विनामास्क फिरत आहेत. व्यापारी, नागरिक, बाजारपेठ, कंटेन्मेंड झोन आदींचे फक्त कागदी नियम दिसून येत असून प्रत्यक्षात कुठेच अटकाव, कारवाई दिसून येत नाही बाजरपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद