मनमाडमध्ये एक दिवस पुरेल एवढ्याच लसी; त्वरित पुरवठ्याची मागणी

मनमाड, (जि. नाशिक) : कोरोनाची दुसरी लाट आता रौद्ररूप धारण करू लागली आहे. मनमाड शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहराची चिंता वाढली आहे. शासनातर्फे उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू आहे.

पुरेसा साठा उपलब्ध नाही 

कोविड लस देण्यास सुरवात झाली असली तरी, मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात एक दिवस पुरेल इतका साठाही उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देत लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उद्यापर्यंत लस उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागेल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे यांनी सांगितले. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

''तर लसीकरण केंद्र ठेवावे लागेल बंद'' 

रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर आरोग्य सुविधा अपुरी पडण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला होता. दररोज लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. संभाव्य धोका ओळखून तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे यांनी शहरासाठी जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे लशीची मागणी केली होती. आतापर्यंत उपजिल्हा रुग्णालयात २ हजार ४६० व्यक्तिंना लस देण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ९) लस देण्यासाठी केवळ शंभर लशी उपलब्ध आहेत. त्यानंतर लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागणार आहे. डॉ. नरवणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना पत्र देत लशीचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

उपजिल्हा रुग्णालयात लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तातडीने लस मिळावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
- डॉ. जी. एस. नरवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मनमाड