मनमाडला ‘जनता कर्फ्यू’; तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय

मनमाड (जि. नाशिक) : सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत असून, समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करून कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दवाखाने, मेडिकल वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने समूह संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी कमी होण्याचे लक्षण दिसत नाही. शहरात ताप, अंगदुखी, थंडी कसकसचे रुग्ण वाढत असून, दवाखाने फुल झाले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याबाबत आमदार सुहास कांदे यांनी लक्ष घालून उपाययोजनेबाबत आढावा बैठक घेतली. पालिका प्रशासनाने बैठक घेऊन नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी पावले उचलली आहेत. सर्व दुकाने बंद ठेवणार असून, डेअरीबाबत वेळ निश्चित केली आहे. सकाळी, सायंकाळी सात ते नऊ या वेळेत दूध विक्री केली जाईल. मनमाडकर या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, असा आशावाद मुख्याधिकारी डॉ. मुंडे यांनी व्यक्त केला. 
तीन दिवसांत उपाययोजना म्हणून पालिकेतर्फे विविध पथकांची स्थापना करण्यात आली असून, कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारून त्यांना गृहविलगीकरण केलेले आहे. असे बाधित झालेले रुग्ण शहरात इतरत्र फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कोरोना केंद्रामध्ये भरती करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

पोलिसांची कसरत 

मनमाड शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात असला तरी चौकाचौकांत टोळके करून रस्त्यावर सर्रास फिरताना दिसतात. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर प्रत्येकाला घरात राहिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना ॲक्शन मोडवर यावे लागणार असून, रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करावा लागणार आहे.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती