मनमाडला मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन; महावितरणच्या भरतीत न्यायाची मागणी 

मनमाड (नाशिक) : महावितरण कंपनीत एसईबीसीला वगळून होणाऱ्या भरती प्रक्रियेविरोधात बुधवारी (ता.२) मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत उपकार्यकारी अभियंता संदीप शिंदे यांना निवेदन दिले. उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी करत सरकारच्या भूमिकेचा या वेळी धिक्कार केला. 

येथील वीज महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलनाला सुरवात झाली. या वेळी मनमाड शहरातील मराठा समाजातील महिला-पुरुष उपस्थित होते. भगव्या टोप्या घालत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, राज्य सरकारच्या भूमिकेचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरवात झाली. महावितरण कंपनीत सुरू असलेल्या ‘उपकेंद्र सहाय्यक’ या पदासाठी भरती प्रक्रियेत एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीत डावलल्याबद्दल मराठा समाजात असंतोष पसरल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

मराठा समाजात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून, मराठा आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे विविध भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. मराठा युवकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी राज्य सरकारच्या आरक्षणाच्या घूमजाव नीतीचा जाहीर धिक्कार करत भारती प्रक्रिया आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्यासाठी येथील वीज महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप शिंदे यांना निवेदन दिले. या वेळी आम्हाला ओबीसीमधून नव्हे, तर एसईबीसीमधून आरक्षण पाहिजे. काही राजकारणी दिशाभूल करत असल्याचा आरोप मनमाड शहर सकल मराठा समाजने केला. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची