मनमानी थांबवा, अन्यथा उद्रेक होईल! शेतीची वीजतोडणी त्वरित थांबवण्याची प्रहारची मागणी 

येवला (जि. नाशिक) : शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना शासन आदेशावरून थकीत वीजबिलाने शेती पंपाची वीज तोडण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने हाती घेतली आहे. याला शेतकऱ्यासह विविध संघटनांचा विरोध असून, शासनानेही मोहीम त्वरित थांबवावी यासाठी जिल्ह्यातील प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. ही मोहीम न थांबविल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा प्रहारने दिला आहे. 

या मागणीसाठी प्रांताधिकारी सोपान कासार यांना निवेदन देण्यात आले. शासन सोळा तासाच्या विजबिलाची रक्कम अनुदान स्वरूपात वीज वितरण कंपनीस देत असून शेतकर्यांना प्रत्यक्ष वीज आठ तास अन् तिही अत्यंत कमी दाबाने विस्कळीत पुरविली जाते. २०१६/१७ साली आयआयटी पवई या संस्थेने सर्वेक्षण अहवाल सादर करून याबाबत सादर केलेल्या अहवालात ४४ हजार कोटी रुपये अनुदानापोटी जास्त रक्कम वीज वितरण कंपनीने लाटल्याचे उघड केले आहे. अगोदरच शेतकरी दुष्काळ,गारपीट, चक्रीवादळ, कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला असताना शासनाने शेतकऱ्यांना मदत, शेतमालास योग्य भाव न देता वसुली मोहीम राबवत सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी ते शेतकऱ्यांचे कधीच नसते हे सिद्ध केले आहे. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

याबाबत कुठलीही पूर्वसूचना न देता वीज का कापण्यात आली याचा जाब चांदवड तालुक्यातील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्यासह शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांना अरेरावी करत त्यांचेवर ३५३ सारखे गुन्हे दाखल करून न्याय मागणाऱ्याचीच मुस्कटदाबी करत अन्याय केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, संघटक किरण चरमळ, उपाध्यक्ष वसंतराव झांबरे, शंकर गायके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, नवनाथ लभडे, प्रहरचे बापू शेलार, रामभाऊ नाईकवाडे, सुनील पाचपुते, गोरख निर्मळ, बाळासाहेब बोराडे, जनार्धन गोडसे, धनंजय खरोटे आदी शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा