मनसेचा नाशिक पूर्व मतदारसंघावर दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताना लोकसभेच्या मैदानातून सपशेल माघार घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केले असून, तब्बल २० मतदारसंघांत मनसे आपला उमेदवार देणार आहे. त्यासाठी ‘मनसे’कडून महायुतीकडे मुंबईसह नाशिक, पुण्यातील २० जागांची मागणी झाली असून, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याची माहिती समोर येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सबुरीचा सल्ला देताना, लाेकसभा निवडणुकीतून माघार घेत महायुतीला पाठिंबा दिला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत मोठी चाल खेळण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले होते. आता आगामी विधानसभेचे वारे वाहत असून, प्रत्येक पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. त्यामध्ये मनसेही आघाडीवर असून, महायुतीकडे मनसेने २० जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये मुंबईसह नाशिक आणि पुण्यातील काही जागा मागितल्या आहेत. यासंदर्भात मनसेची १३ जून रोजी बैठक होत असून, त्यात जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यकारिणी निवडणूकदेखील या बैठकीमध्येच होणार असल्याने, त्यात विधानसभा निवडणुकीत कोणाला मैदानात उतरवयाचे याबाबतदेखील विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कधी काळी नाशिकमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मनसेचे आमदार होते. तिथे गेल्या दोन पंचवार्षिकपासून भाजपचे आमदार आहेत. अशात हे तिन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले समजले जात असल्याने, मनसेला ते कितपत मिळतील हा प्रश्न आहे. सूत्रानुसार मनसेने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची महायुतीकडे मागणी केली आहे. या मतदारसंघात मनसेचे माजी पदाधिकारी आणि सद्यस्थितीत भाजपचे ॲड. राहुल ढिकले विद्यमान आमदार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. विशेष बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी महायुतीच्या उमेदवारास नाशिक पूर्वमधून समाधानकारक मताधिक्य मिळवून दिले आहे. अशात भाजप हा मतदारसंघ मनसेला देणार काय? हा प्रश्न आहे.

नाशिक पूर्वमधून बाळा नांदगावकर मैदानात

मनसेने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरविण्याची तयारी केल्याचीही माहिती समोर येत आहे. मनसेने मुंबईमध्ये मराठी मतदारांची संख्या असलेल्या दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम आदी मतदारसंघांची महायुतीकडे मागणी केली आहे. या मतदारसंघात मनसेच्या मोठ्या फळीतील नेत्यांना उतरविण्याची तयारी मनसेकडून केली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज ठाकरे यांचा असून, ते जे ठरवतील त्यानुसार आम्ही नियोजन करणार आहोत. राज साहेबांचा आदेश अंतिम असेल. – सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे.

हेही वाचा: