मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

सुदाम कोंबडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तिपत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (दि. १५) मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी त्यांना प्रदान केले.

मनसेचे नेते दिलीप दातीर यांनी गेल्या एप्रिल महिन्यात आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळेस त्यांना पक्षाकडून पदावर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता दातीरांच्या जागी कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दातीरांना आगामी लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची पक्षाची तयारी असल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात आल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीच आपल्या नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये नाशिकच्या उमेदवाराला स्थान दिले गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. अशात लवकरच नाशिकच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, कोंबडे यांच्या नियुक्तीप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे-भाजप-मनसे

सुदाम कोंबडे हे २०१३ मध्ये मनसेचे तीन वर्षे कालावधीसाठी जिल्हाध्यक्ष होते. दरम्यान, २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडेच त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला. मनसेचे यापूर्वीचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिला होता. मात्र, त्यावर राज ठाकरे यांनी निर्णय घेतला नव्हता. कोंबडे यांची नियुक्ती केल्यामुळे दातीर यांचा राजीनामा आपोआपच मंजूर झाला आहे.

हेही वाचा :

The post मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती appeared first on पुढारी.