मनसैनिकांना मोठा धक्का! मध्य विधानसभा निरीक्षक सचिन भोसलेंना पदावरून हटविले

नाशिक  : मनसे शहराध्यक्षपदाचे दावेदार व मध्य विधानसभा निरीक्षक सचिन भोसले यांना तडकाफडकी पदावरून हटविल्याने पक्षांतर्गत राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेशी अधिक जवळिकीमुळे भोसले यांना पदावरून हटविल्याचे बोलले जात आहे. पाच वेळा नगरसेवकपदावर राहिलेल्या (कै.) सुरेखा भोसले यांचे चिरंजीव सचिन भोसले यांची गेल्या वर्षी मध्य विधानसभा निरीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. 

राजकीय वातावरण गरम 

नाशिकमध्ये मनसेला चांगले वातावरण असूनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात नसल्याचे निमित्त करून गेल्या वर्षीच्या अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दुय्यम फळीतील कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळाले होते. शहर कार्यकारिणीसह महत्त्वाचे बदल घडणार, अशी चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात एका विवाह सोहळ्यानिमित्त राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी भोसले यांनी बॅनरच्या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. नाशिक दौऱ्यात राज ठाकरे बैठक घेऊन काही बदल करतील असे अपेक्षित असताना गुरुवारी (ता. ११) अचानक भोसले यांनाच पदावरून हटविण्याचे पत्र मनसेच्या राजगड कार्यालयात प्राप्त झाल्याने मनसैनिकांना मोठा धक्का बसला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला. राज ठाकरे सांगतील तोच आदेश असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

शिवसेनेशी जवळीक भोवली? 

प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनेसच्या ॲड. वैशाली भोसले यांची बिनविरोध निवड झाली. त्या वेळी पक्षाच्या एकाही ज्येष्ठ नेत्याला विचारात घेतले गेले नाही. मुंबई महामार्गावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाफलकांवर सचिन भोसले यांचे छायाचित्र असल्याची बाब राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. स्थायी समिती सदस्याची नियुक्ती करताना पक्षाकडून आलेले शिरीष सावंत यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याची तक्रार राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचविण्यात आली होती. माजी आमदार नितीन भोसले यांनी मनसे भाजपयुक्त झाल्याचे ट्विट काही दिवसांपूर्वी केल्याची बाब पक्षनेतृत्वाला खटकली. मनसेच्या वर्धापन दिनाला नाशिकहून गेलेल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी भोसले यांच्यासंदर्भात तक्रारी केल्याचे बोलले जाते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भोसले यांना पदावरून हटविल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या तोंडावर भोसले यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनसे पक्षसंघटनेत खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. ते सांगतील ती जबाबदारी घेण्यास तयार आहे. 
-सचिन भोसलेे