नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एका ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या गुन्ह्यातील संशयितांच्या यादीत तुमचे नाव असल्याचे सांगत भामट्यांनी सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यास तब्बल ४५ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगंबर शालिग्राम (६१. रा. डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड) यांनी फिर्याद दिली आहे. भामट्यांनी त्यांना ७ ते १३ मार्चदरम्यान गंडा घातला. भामट्याने शालिग्राम यांना मोबाइलवरून संपर्क साधला. तुम्हाला ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या गुन्ह्यात अटक करण्यात येईल. तुमचा या गुन्ह्यात सहभाग असून, अटक टाळण्यासाठी पैसे देण्याची मागणी केली. भामट्यांनी ते मुंबई पोलिस व सीबीआयमधून बोलत असल्याची बतावणी केली होती. तसेच व्हिडिओ कॉलवरून संपर्क करून ते अधिकारी असल्याचे सांगत होते. त्यामुळे भीतीपोटी शालिग्राम यांनी त्यांच्याकडील मुदतठेवी मोडून ४५ लाख १० हजार रुपयांची रोकड भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात वर्ग केली. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शालिग्राम यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार शालिग्राम यांच्यासोबत संपर्क साधणाऱ्यासह ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा घातला गंडा
संशयितांनी शालिग्राम यांना फोन करून ते मुंबईहून सीबीआय पोलिस म्हणून बोलत असल्याचे सांगितले. यासाठी भामट्यांनी स्काइपवर ‘सीआयडी’च्या नावे बनावट आयडी तयार करून शालिग्राम यांच्यासोबत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधला. यासाठी भामट्यांनी ‘सीबीआय’ कार्यालयासारखा सेटअप तयार केला. मुलाच्याही चौकशीचा धाक दाखवला. मुदतठेवीतील पैसे ‘सीबीआय’कडे जप्त न केल्यास अटकेचाही धाक दाखवला. सीबीआय, सीआयडी, ईडी, पोलिस यासंदर्भातील तपास करीत असून, केव्हाही अटक होईल, असेही धमकावण्यात आले. त्यामुळे शालिग्राम यांनी घाबरून मुदतठेवी मोडून भामट्यांना पैसे दिले.
संशयितांनी शालिग्राम यांना मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची भीती दाखवली. नागरिकांनी अशा कोणत्याही दबावास बळी पडू नये. अनोळखी क्रमांक, मेल, सोशल मीडियावरून कोणी संपर्क साधल्यास त्याची शहानिशा करावी. तसेच पैशांची मागणी होत असल्यास किंवा धमकावत असल्यास नागरिकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. – रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पाेलिस
हेही वाचा :
- Lok Sabha Election 2024 : नागपूर, रामटेक महायुती नामांकन; उद्या शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री येणार
- Akanksha Puri : गुलाल हो…तो लाल हो; आकांक्षा पुरीने शेअर केले टॉपलेस फोटो
- Akanksha Puri : गुलाल हो…तो लाल हो; आकांक्षा पुरीने शेअर केले टॉपलेस फोटो
The post 'मनी लॉन्ड्रिंग'त सहभागी असल्याचे धमकावत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यास ४५ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.