येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथे मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या सभेवेळी त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रविवारी (दि. 5) रात्री कोपरगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
येथे मागील महिन्यात जरांगे-पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यासाठी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या अपघातात गोकुळ रावसाहेब कदम हा तरुण जेसीबीमधून खाली पडला होता. त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून त्याच्यावर कोपरगाव येथे उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्याची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. गोकुळवर त्याच्या मूळ गावी नेवरगाव (ता. येवला) येथे सोमवारी (दि. 6) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गोकुळ याच्या कुटुंबाची अतिशय हलाखीची परिस्थिती असून त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अंत्यविधीप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन माणिकराव शिंदे, अमृता पवार, संजय बनकर, वसंतराव पवार, योगेश जहागीरदार यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेना नेते संभाजी पवार, राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) प्रदेश उपाध्यक्ष शाहू शिंदे, रिपाइंचे प्रकाश वाघ, भागवतराव सोनवणे, शेतकरी संघटनेचे संतू झांबरे-पाटील, सुरेश कदम बाळासाहेब गुंड, छगन आहेर आदींसह सकल मराठा समाजातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
The post मनोज जरांगे-पाटलांवर फुलांची उधळण करताना अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.