मरणानंतरही नाही सुटका! नशिबी प्रतिक्षाच; जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

नाशिक : शहरातील मुख्य अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी पुन्हा एकदा वेटिंग (प्रतीक्षा) करण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे झालेला मृत्यू आणि नैसर्गिक मृत्यू झालेल्यांचे अमरधामध्ये मृतदेह येत आहेत. त्यामुळे चक्क जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली असल्याचे विदारक दृश्‍य सध्या बघावयास मिळत आहे. 

मरणानंतरही नाही सुटका! नशिबी प्रतिक्षाच

गेल्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. केवळ विद्युत दाहिनीमध्ये अत्यंसंस्कार करण्यास परवानगी होती. एकच दाहिनी असल्याने वेटिंग होणे शक्य होते. त्यानंतर दुसरी विद्युत दाहिनी बसविण्यात आली. तसेच पारंपरिक अंत्यविधी करण्यास परवानगी देण्यात आल्याने वेटिंगचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तीन ते चार दिवसांपासून अमरधाम अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेह आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नशिबी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

जमिनीवरच अंत्यसंस्कार

शुक्रवारी (ता. २६) ३३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी दुपारपर्यंत २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. रविवारीही प्रमाण अधिक होते. अमरधामची क्षमता जादा नसल्याने शेवटी जमिनींवर काही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. तीन ते चार दिवसांपासून जमिनीवरच अंत्यसंस्कार केले जात असल्याचे विदारक चित्र आहे. सध्या एक विद्युत दाहिनीची दुरुस्ती सुरू असल्याने ती बंद आहे. अमरधाममध्ये एका वेळेस जास्तीत जास्त १६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शक्य आहे. अशा वेळेस अधिक मृतदेह आल्यास त्यांच्यावर जमिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

दुसरी विद्युत दाहिनी कार्यान्वित करण्याची मागणी 
दुरुस्तीसाठी बंद ठेवलेली विद्युत दाहिनी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवाय पारंपरिक पद्धतीने सर्वच अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यास परवानगी असल्याने मृतांच्या नातेवाइकांनी जवळच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करावेत. त्यामुळे मुख्य अमरधामवर अतिरिक्त ताण पडणार नाही. 
 

नदीकाठीच अंत्यसंस्कार करावेत, अशी अनेकांची इच्छा असते. त्यानुसार मृत व्यक्तीचे कुटुंब शहरातील मुख्य अमरधाममध्ये येत आहेत. शिवाय येथील विद्युत दाहिनीची दुरुस्ती सुरू आहे. 
-सुनील शिरसाठ, विभागीय स्वच्छता निरीक्षक