मरण्यापेक्षा जगण्यासाठी धडपड! ७४ वर्षीय दिव्यांग ज्येष्ठाची मन हेलावणारी संघर्षकथा

नाशिक : कोरोनानंतर उपासमारीने मरण्यापेक्षा जगण्यासाठी धडपड करावी लागते. बाजारपेठ बंद असताना रामभरोसे थोडेफार तरी कमाई होईल आणि आजचा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटेल, या आशेपोटी बंदच्या काळात आणि रणरणत्या उन्हात दुकान लावणाऱ्या दिव्यांग वृद्धाचे संघर्षपूर्ण जीवनाचे चित्र नागरिकांच्या मनाला हेलावून टाकत आहे. 

उपासमारीने मरण्यापेक्षा जगण्यासाठी धडपड 
शनिवारी (ता. १३) सर्वच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. अशात रविवार कारंजा परिसरात रणरणत्या उन्हात ७४ वर्षीय दिव्यांग वसंत सोनवणे मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करताना दिसले. तीन छोट्या बांबूची त्रिकोणी स्टॅन्ड बनवून त्यावर कापडी पिशवी आणि चिमुकल्यांना खेळण्यासाठी असलेल्या कागदी फिरकी अडकवून विक्री करत होते. आयुष्यातील आरामदायी जीवन जगण्याच्या काळात वृद्ध पत्नी आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांना अशा प्रकारचा संघर्ष करण्याची वेळ त्यांच्या नशिबी आली. त्यांना एक मुलगा आहे; परंतु तो रंगकामानिमित्ताने अनेक वर्षांपासून बाहेरगावी आहे. स्वतःसह पत्नीच्या उदरनिर्वाहसाठी त्यांना स्वतः काम करण्याची वेळ आली.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

उदरनिर्वाहासाठी ७४ वर्षीय दिव्यांग ज्येष्ठाची संघर्षकथा 

शनिवारी सर्वत्र बंद असताना ते नेहमीप्रमाणे रस्त्यावर दुकान लावून ग्राहकांची वाट पाहत होते. त्यांच्याशी चर्चा केली असता, बंद आहे याची माहिती आहे; परंतु कोरोनाच्या भीतीने बंद ठेवले तर उपासमारीची वेळ येईल. दैनंदिन दुकानाच्या माध्यमातून जी रक्कम मिळते त्यातून त्या दिवसाची भाकरी मिळते. तेच नसेल तर कोरोना नंतर प्रथम उपासमारीने मरण्याची वेळ येईल. त्या मुळे बंदची चिंता न करता रामभरोसे थोड्या प्रमाणात वस्तू विक्री आणून दुकान लावले. याच दुकानाच्या माध्यमातून घरभाडे जाते. उर्वरित रक्कम आणि संजय गांधी योजनेतून मिळणारे एक हजार रुपये यातून पत्नी आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरत कुटुंब चालविले जाते. पूर्वी रंगकाम करत फावल्या वेळेत बाजारात या वस्तू विक्री करत. वय वाढल्याने रंगकाम करणे आणि बाजार- बाजार फिरणे शक्य नाही. त्या मुळे रविवार कारंजा परिसरात रस्त्यावर दुकान लावत असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 
 

वयाच्या १५ वर्षांपासून संघर्षमय जीवन जगत आहे. ते आजही तसेच आहे. त्या मुळे कोरोना काय आणि मरण काय, याची चिंता न करता रस्त्यावर दुकान लावून आजच्या दिवसासाठी जगत आहे. 
-वसंत सोनवणे