मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा; डॉ. रावसाहेब कसबे, शफाअत खान यांचा समावेश

नाशिक : मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे लोटू पाटील नाट्यपुरस्कार, यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार, प्रा. भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. यात ख्यातनाम नाटककार शफाअत खान यांना लोटू पाटील नाट्यपुरस्कार, विचारक डॉ. रावसाहेब कसबे यांना यशवंतराव चव्हाण विशेष बाङ्मय पुरस्कार, तर प्रा. भगवंत देशमुख विशेष वाङ्मयपुरस्कारासाठी पत्रकार दिप्ती राऊत यांची निवड झाली आहे.

दोन पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व निवड समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत आणि तिसरा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी अकरा हजार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे आहे. 

सोयगाव येथील ग्रमीण रंभभूमीचे प्रणेचे लोटू पाटील यांच्या नावाने मराठवाडा साहित्य परिषदेने २००६ पासून हा पुरस्कार सुरू केलेला असून नाटालेखनाच्या किंवा नाट्यरंगभूमीच्या क्षेत्रात लक्षणीय कार्य करणा-या नाटककाराला किंवा रंगकर्माला देण्यात येतो. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे २००६ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा गेल्या ३० वर्षाहून अधिक काळापासून संवेदनशीलता, प्रागतिकता, सामाजिक विषयाला व निरनिराळ्या विषयांना थेट भिडण्याचा वकूब, नाट्यलेखनाची बलस्थाने असलेल्या शफाअत खान यांची निवड करण्यात आली आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

यशवंतराव चव्हाण विशेष बाङ्मय पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध विचारक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या, 'गांधी पराभूत राजकारणी विजयी महात्मा' या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता म्हणून मराठवाडा साहित्य परिषद २००७ पासून पुरस्कार प्रदान करत आहे. डॉ. कसबे हे 'झोत' या आपल्या पहिल्याच ग्रंथाने प्रकाशात आलेले आणि मान्यता पावलेले विचारवंत आहेत. प्रा. भगवंत देशमुख विशेष वाङ्मयपुरस्कार दीप्ती राऊत यांना त्यांच्या कोरडी शेत, ओले डोळे' या ललित गद्यास देण्यात येणार आहे. दीप्ती राऊत यांचे या पुस्तकाशिवाय धगधगती मुंबई' आणि 'कुंभमेळा' हे सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्नांवरील अनुवादित पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहे. सोयीच्या तारीख व परिस्थती लक्षात घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे आणि कार्यक्रम समितीप्रमुख डॉ. केलास इंगळे हे यावेळी उपस्थित होते.  

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा