मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाच्या आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचाच खरा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सभोवताली घुटमळणाऱ्या मराठा बांंधवांनी शहाणे व्हावे. भुजबळ यांचे गेल्या दोन दिवसांमधील जाहीर आणि कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीद्वारे झालेले संभाषण व्हायरल होत असून, यामध्ये त्यांचा मराठा समाजाप्रतिचा द्वेष दिसून येत आहे. भुजबळांची ही विधाने म्हणजे निपक्षतेचा भंग असून, त्यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी केली आहे.

गायकर म्हणाले, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून पक्षापातीपणाची विधाने अपेक्षित नाहीत. मात्र, भुजबळ यांनी जाहीरपणे अशा प्रकारची विधाने केली आहेत. भुजबळांचा (Chhagan Bhujbal) आजपर्यंतचा राजकीय प्रवास मराठा समाजाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच झाला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुंबईच्या स्वाभिमानी मराठा समाजाने त्यांना चारी मुंड्या चीत केले होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाने त्यांना अंगाखांद्यावर घेऊन राजकीय जीवनात पुन्हा उभे केले. त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही मराठा समाजाने लोकसभेत पाठविले. त्यामुळे त्यांनी इतिहास विसरून विधाने करणे थांबवावे. मराठा समाज कोणाच्याही ताटातील ओरबाडून घेत नाही. घासातील घास देण्याची या समाजाची संस्कृती आहे. अशात भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताना कुठल्याही एका समाजाची, विशिष्ट गटाची बाजू घेणार नाही किंवा त्यांचा तिरस्कार करणार नाही, असे वचन दिले आहे. भुजबळ यांचे सध्याचे वक्तव्य आणि भूमिका या शपथ वचनाचा भंग करणारी असल्याने त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार उरत नसल्याचेही गायकर म्हणाले.

हेही वाचा :

The post मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी appeared first on पुढारी.