
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच मराठा समाजाच्या आरक्षणास पाठिंबा दिला असून, त्यामुळे आम्ही सदैव मराठा समाज बांधवांसोबत आहोत, असा शब्द वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला.
जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सुजात आंबेडकर यांनी भेट देवून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरूवातीपासूनची भूमिका असून, मराठा समाजाला आमची कायम साथ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी, उपोषणकर्त्यांनी म्हटले की, ‘मराठा समाजाच्या शिक्षण व रोजगाराच्या मूलभुत आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. ४० वर्षे मराठा समाजाला सत्ताधाऱ्यांनी फसविले असून, आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. आम्ही आता मूलभूत गरजाही भागवू शकत नसल्याने आमच्या मुलांंसाठी लाखो रुपयांची शैक्षणिक फी कुठून भरणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी आंदोलक चंद्रकांत बनकर, राम खुर्दळ, शरद लभडे, हिरामण वाघ, अॅड. कैलास खांडबहले, सुधाकर चांदवडे, विकी गायधने, संदीप हांडगे, दिनेश सावंत, जगदीश शेजवळ यांच्यासह वंचितचे पवन पवार, शहराध्यक्ष अविनाश शिंदे उपस्थित होते.
२४ डिसेंबरपर्यंत अखंडीत उपोषण
सकल मराठा समाज नाशिक जिल्हा कोअर कमिटीची शिवतीर्थ येथे झालेल्या बैठकीत २४ डिसेंबरपर्यंत अखंडीत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवतीर्थ येथे गेल्या ५५ दिवसांपासून अखंडीत साखळी उपोषण सुरू असून, मनोज जरांगे-पाटील यांच्या सूचनेनुसार नाना बच्छाव यांनी अखंडीत सहा दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते.
हेही वाचा :
- कोल्हापूर : सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी
- पाकच्या हल्ल्यात बीएसएफचा जवान शहीद
- Dhanteras 2023 : धनत्रयोदशी : संपत्ती देवतेच्या पूजेचा दिवस
The post मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे : सुजात आंबेडकर appeared first on पुढारी.