मराठी भाषा गौरव दिन : कुसुमाग्रजांचे साहित्य शाश्वत जीवनमूल्याची पेरणी करून क्रांती करणारे – प्रा. डॉ. सतीश मस्के

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची प्रेरणा ही क्रांती आहे. कुसुमाग्रज यांचे साहित्य समाजनिष्ठ आहे व शाश्वत मूल्याची लेखनीच्या माध्यमातून समाजात पेरणी करणारे आहे असे मत महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सतीश मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राभारी प्राचार्य प्रा.के.डी.कदम हे होते. यावेळी विचार मंचावर प्रा.एल.जे.गवळी, प्रा.डॉ. डब्ल्यू बी शिरसाट व प्रा. डॉ. संजय खोडके आदि उपस्थित होते.

कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात थोर,श्रेष्ठ साहित्यिक,कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ.सतीश मस्के म्हणाले, कुसुमाग्रजांच्या साहित्यातून मानवी मूल्य व जीवनमूल्य सतत प्रवाहित होत असत.त्यांनी आपल्या साहित्यातून शाश्वत मूल्याची पेरणी केलेली दिसून येते. प्रेम, करुणा,प्रामाणिकपणा,सत्य, अहिंसा,बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञानवादी दृष्टिकोन,विवेक, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या शाश्वत मूल्यांची पेरणी करत करत सामाजिक अन्याय,अत्याचार व विषमतेविरुद्ध आपली लेखणी चालवून साहित्य प्रगल्भ केले म्हणूनच त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही साहित्याचे वाचन करून संस्कारशील बनून जीवनमूल्य आपल्या अंगी बाळगायला हवेत. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य प्रा.के.डी.कदम म्हणाले की,विद्यार्थ्यांनी साहित्याचे वाचन करायला हवे.त्यातून संस्कार घेऊन समाजशील व सामाजिक बांधिलकी स्वीकारायला हवी. साहित्यातून माणूस घडत असतो.मराठी भाषा ही व्यक्तिमत्व विकास साधणारी भाषा आहे. भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवायला हवे. यावेळी प्रा.एल.जे.गवळी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेकडे,लेखनाकडे, वाचनाकडे लक्ष द्यायला हवे. आपले शुद्धलेखन शुद्ध व वळणदार लिहायला हवे. विविध साहित्यिकांच्या साहित्यकृतीचा दाखला देत विद्यार्थ्यांनी त्यांचे वाचन करून आपल्या जीवनात बदल करायला हवा. कार्यक्रमाचे आभार, सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.एल.जे.गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थी,प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी बहुसंख्य उपस्थित होते.

हेही वाचा:

The post मराठी भाषा गौरव दिन : कुसुमाग्रजांचे साहित्य शाश्वत जीवनमूल्याची पेरणी करून क्रांती करणारे - प्रा. डॉ. सतीश मस्के appeared first on पुढारी.