मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या यादीत डॉ. बाळ फोंडके यांचे नाव

नाशिक : शहरात मार्चमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठीच्या नावांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचे माजी संचालक तथा विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांचे नाव मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या यादीत समाविष्ट असल्याची माहिती नाशिकपर्यंत येऊन धडकली आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २३) आणि रविवारी (ता. २४) नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीसाठी साहित्यिकांच्या मांदियाळीवर विचारविनिमय करून शिक्कामोर्तब करण्याचे आव्हान असेल, असे मानले जात आहे. 

यांच्या नावापासून सुरवात

संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीला डॉ. अनिल अवचट, भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे यांच्या नावापासून सुरवात झाली. हा प्रवास पुढे मनोहर शहाणे, यशवंत मनोहर, तारा भवाळकर, प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, विचारवंत जनार्दन वाघमारे असा पुढे सुरू राहिला आहे. त्यात आता डॉ. फोंडके यांच्या नावाची भर पडली आहे. अंतराळ, आपले पूर्वज, खगोल, पशू-पक्षी, प्राणीजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या ‘विज्ञान नवलाई’ या पुस्तक मालिकेतील आहेत. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

उद्या पहाटे प्रतिनिधींचे आगमन
 
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महामंडळासह संलग्न अन् घटक संस्थांचे प्रतिनिधी शनिवारी (ता. २३) पहाटे नाशिकमध्ये येताहेत. दोन दिवस संमेलनाध्यक्षपदावर खल करत असताना इतर तयारीच्या दृष्टीने बैठकीत विचारविनियम केला जाणार आहे. त्याचबरोबर स्वागताध्यक्षपदाच्या निवडीबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार