मळ्यात गेलेले बाबा सायंकाळी परतलेच नाही; महाशिवरात्रीची दुर्दैवी घटना

सिन्नर (जि.नाशिक) :  गुरुवारी महाशिवरात्री असल्याने दुपारी दीडच्या सुमारास ते फराळ करून मळ्यात घासाला पाणी भरायला जातो, असे सांगून बाबा बाहेर पडले. पण सायंकाळ झाली तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता. जेव्हा घटनेचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. काय घडले नेमके?

सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगरची घटना 

राजाराम त्र्यंबक सोनवणे (रा. काळे मळा, धोंडवीरनगर, मनेगाव) असे या वृद्धाचे नाव असून, त्यांचा व्हिसेरा हैदराबाद येथील वन विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. गुरुवारी महाशिवरात्री असल्याने दुपारी दीडच्या सुमारास ते फराळ करून मळ्यात घासाला पाणी भरायला जातो, असे सांगून बाहेर पडले. काही शेतकऱ्यांनी त्यांना सायंकाळी मळ्यात पाहिले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या मुलाने मळ्याकडे शोध घेतला. मात्र, ते तेथे आढळून आले नाही. त्यानंतर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भाऊसाहेब सोनवणे त्यांच्या शेताकडे कांदे काढणीसाठी जात असताना, हातपायाचे लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसपाटील बाळासाहेब पवार यांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. सोनवणे यांच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

व्हिसेरा अहवालानंतर मदत 
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली असता, घटनास्थळी तीस फुटांच्या परिसरात जमिनीवर रक्त पडलेले आढळून आले. मृताच्या अंगावरील जखमा बिबट्याने केल्या असल्याचे स्पष्ट झाले. सोनवणे यांच्या डाव्या पायाची मांडी व उजव्या हाताचा काही भाग बिबट्याने फस्त केला असून, छातीवरही नखांचे ओरखडे दिसून आले. व्हिसेराचा अहवाल आल्यानंतर सोनवणे यांच्या वारसांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले. 

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज

गुरुवारी (ता. ११) दुपारी दीडच्या सुमारास शेतातील घासाला पाणी भरायला जातो, असे सांगून गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा लचके तोडलेला मृतदेह शुक्रवारी (ता.१२) सकाळी शेतात आढळून आला. मनेगाव, धोंडवीरनगर (ता. सिन्नर) परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून, वृद्धाच्या अंगावरील जखमांवरून बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

परिसरात दोन पिंजरे 
सोनवणे यांचा मृतदेह आढळून आलेल्या शेतापासून काही अंतरावर कुक्कुटपालन केंद्र आहे. तेथील मजुरांना दोन-तीन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. परिसरातील कोलतीचा बंधारा भागात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला आहे. त्यामुळे वन विभागाने आता तातडीने परिसरात दोन पिंजरे लावले आहेत.