‘मविआ’ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग

दिंडोरी लोकसभा,www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- भाजप फोडाफोडीचे राजकारण करून राज्याची अस्मिता धुळीला मिळवत आहे. नोटबंदी, निर्यातबंदी आदी हुकूमशाही निर्णय घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून, महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी अन हुकूमशाही गाडण्यासाठी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले. (Dindori Lok Sabha)

दिंडोरी येथे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिंडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर प्रथमच बैठक पार पडली. महाआघाडीने लोकसभेचे रणशिंग फुंकत यंदा दिंडोरी लोकसभा एकीने काबीज करायची असा निश्चय केला.

श्रीराम शेटे यांनी सांगितले की, काँग्रेसने देशाचा खऱ्या अर्थाने विकास केला असून, शरद पवार यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आखली जात होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीदेखील कोरोना कालावधीत उत्कृष्ट काम केल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील, कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, मविप्र संचालक प्रवीण जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ आदींसह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नरेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. संतोष रेहरे यांनी आभार मानले. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जयंत दिंडे, दत्तात्रेय पाटील यांनी तुतारी उंचावत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तसेच जनतेत भाजपबद्दल रोष असल्याची संधी साधत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याची व्यूहरचना आखण्यात आली.

इच्छुक उमेदवार असे..

भास्कर भगरे, कैलास शार्दुल, चिंतामण गावित, बी. बी. बहिरम, ज्ञानेश्वर भोये, टोपले

हेही वाचा :

The post 'मविआ'ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग appeared first on पुढारी.