मविप्र निवडणूक : सरचिटणीस-अध्यक्षपदासाठी चुरस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्थेत सरचिटणीसपदाप्रमाणेच अध्यक्षपदालाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पदासाठी दोन्ही पॅनलकडून तुल्यबळ उमेदवारांना मैदानात उतरविण्यात आले आहे. मागील कार्यकारिणीतील चिटणीसपद भूषविणार्‍या डॉ. सुनील ढिकले यांना प्रगती पॅनलकडून बढती देण्यात आली आहे. ते आता अध्यक्षपदाची उमेदवारी करणार आहेत. तर परिर्वतन पॅनलकडून अध्यक्षपदासाठी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे उमेदवार देण्यात आले आहे. ‘प्रगती’कडून नीलिमा पवार तर ‘परिवर्तन’कडून अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सरचिटणीसपदासाठी आव्हान उभे केले आहे.

प्रगती पॅनलकडून नाना महाले (नाशिक शहर), सचिन पिंगळे (नाशिक ग्रामीण), हेमंत वाजे (सिन्नर), उत्तम भालेराव (चांदवड), भाऊसाहेब खातळे (इगतपुरी), डॉ. जयंत पवार (मालेगाव) हे संचालकपदाचा किल्ला पुन्हा लढविणार आहेत. केदा आहेर (देवळा), सुरेश कळमकर (दिंडोरी), चेतन पाटील (नांदगाव), विशाल सोनवणे (सटाणा), धनजंय पवार (कळवण), माणिकराव शिंदे (येवला), दत्तात्रय गडाख (निफाड) या नवीन शिलेदारांवर ‘प्रगती’ची धुरा सोपविण्यात आली आहे.

निफाड तालुक्यातून सभापतीसाठी दोन्ही पॅनलकडून उमेदवार देण्यात आले आहे. ‘प्रगती’कडून माणिकराव बोरस्ते तर ‘परिवर्तन’कडून बाळासाहेब क्षीरसागर यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. महिला संचालकपदासाठी शोभा बोरस्ते व सिंधूबाई आढाव यांच्यात लढत रंगणार आहे. तसेच नव्याने निर्माण झालेल्या उपाध्यक्षपदासाठी ‘प्रगती’कडून दिलीप मोरे तर ‘परिवर्तन’कडून विश्वास मोरे या दोन निफाडच्या भूमिपुत्रांचा सामना होणार आहे. तसेच डी. बी. मोगल हे उपसभापतिपदासाठी उमेदवारी करणार आहेत. त्यांच्यासमोर विलास बच्छाव यांचे आव्हान असणार आहे.

चांदवड तालुका संचालकपदासाठी प्रगती पॅनलकडून उत्तमबाबा भालेराव व डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यात शेवटपर्यंत रस्सीखेच होती. मात्र, अखेर भालेराव यांनी बाजी मारत उमेदवारी पटकाविली. तर परिवर्तन पॅनलकडून डॉ. सयाजी गायकवाड आणि शिरीष कोतवाल इच्छुक होते. मात्र, माघारीच्या शेवटच्या दिवशी डॉ. गायकवाड उमेदवारी मिळविण्यात सरस ठरले. नांदगावमध्ये चेतन पाटील यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारत उमेदवारी मिळविली.

डॉ. शेवाळे, अहिरे यांचा पत्ता कट
मागील पंचवार्षिकमध्ये मविप्र संस्थेचे अध्यक्षपद भूषविणार्‍या डॉ. तुषार शेवाळे व उपसभापती राघोनाना अहिरे या दोघांनाही प्रगती पॅनलमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. डॉ. शेवाळे व अहिरे यांना उमेदवारी नाकारत नव्यांना संधी देण्यात आली. डॉ. शेवाळे यांच्या रूपाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संस्थेतून आउट झाले. तर केदा आहेर यांच्या रूपाने भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या ‘एन्ट्री’चा मार्ग खुला झाला. तर अ‍ॅड. रवींद्र पगार यांनाही संस्थेतील प्रवेशासाठी पुढील पाच वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.

..आणि अ‍ॅड. पगार यांची संधी हुकली
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार हे परिवर्तन पॅनलकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते. अ‍ॅड. पगार हे कार्यकारिणीतील पदासाठी आग्रही होते. मात्र, पॅनलकडून त्यांना तालुका संचालकपदाची ऑफर देण्यात आली होती. दुपारी 2 वाजेपर्यंत अ‍ॅड. पगार कार्यकारिणी पदावर अडून बसले होते. त्यानंतर त्यांनी तालुका संचालक होण्याचे मान्य केले. तोपर्यंत पॅनलकडून दुसर्‍या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अ‍ॅड. पगार यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने फोन केला होता. मात्र, पॅनलप्रमुखांनी नम— शब्दात नकार दिल्याने अ‍ॅड. पगार यांची यंदा संधी हुकली.

शिष्टाई, मनधरणी अन् अश्रू
दोन्ही पॅनलकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना पॅनलप्रमुखांची दमछाक झाली होती. केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांची शिष्टाई कामी आली. तर डॉ. सुनील ढिकले यांच्यासाठी आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले हे दिवसभर तळ ठोकून होते. दत्तात्रय पाटील यांच्यासाठी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी मध्यस्थी केली. उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून पॅनलप्रमुखांची मनधरणीचा प्रयत्न केला. तर प्रगती पॅनलकडून उमेदवारी न मिळाल्याने एका इच्छुकाला अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा :

The post मविप्र निवडणूक : सरचिटणीस-अध्यक्षपदासाठी चुरस appeared first on पुढारी.