महागाईच्या काळात देवपूरपाडेच्या शेतकऱ्याचा प्रयोग! घरच्या घरीच कांदा बियाणे केले तयार 

महालपाटणे (जि.नाशिक) : गेल्या वर्षी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे कांद्याचे क्षेत्र कमी झाले. कांद्याचे बियाणेही महागले. बऱ्याच शेतकऱ्यांनी चढ्या दराने कांदा बियाणे घेऊनही बोगस बियाण्यांमुळे फसवणूक झाली. त्यामुळे देवपूरपाडे (ता. देवळा) येथील शेतकरी सुकदेव आहिरे यांनी स्वतः घरीच बियाणे तयार केले. कसे ते वाचा....

सुधारित पद्धतीने कांदा रोपांची लागवड

अनेक शेतकरी स्वतःच्या शेतातच कांदा बियाणे तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र कसमादे परिसरात दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांना रोपांसाठी पायलीला (चार किलो) ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागले. कांदा बियाण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च आल्याने पुढील हंगामात कांदा लागवडीसाठी महागडे बियाणे घेण्याऐवजी शेतकऱ्यांनी बियाणे स्वतः तयार करण्यावर भर दिला आहे. या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने कांदा रोपांची लागवड केली आहे. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

पीकपद्धती बदलून आधुनिकतेची कास
देवपूरपाडे येथील सुकदेव आहिरे यांनी मल्चिंग कागदावर बेड करून लागवड केली. डोंगळे हवेने पडून नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक बेडला टोमॅटो बांधणीच्या तारांनी व बांबूने बांधणी केली आहे. वारा लागून बी खाली पडू नये म्हणून शेताच्या चोहोबाजूंनी कापड बांधले आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांना फाटा देत पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. त्यामुळे रोगट हवामानाचा या पिकावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. श्री. आहिरे यांच्या एका एकरातील या डोंगळ्यांना त्यांच्या अंदाजानुसार चारशे किलोपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. या सेंद्रिय शेतीचे अनुकरण करून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनीही आपली पीकपद्धती बदलून आधुनिकतेची कास धरली आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

या वर्षी बाजारातील महागडे बियाणे घेऊनसुद्धा बहुतांश बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे चांगल्या प्रतीचा कांदा आणून बियाणे तयार करण्याचे ठरवले. आतापर्यंत डोंगळे छान आहेत. कोणतेही पीक घेताना जास्तीत जास्त जमिनीची मशागत व सेंद्रिय शेतीवर भर असतो. - सुकदेव अहिरे, शेतकरी, देवपूरपाडे